असरोंडी शाळा नं. १ च्या पालकांचे उद्याचे आंदोलन स्थगित !
प्रशालेच्या छप्पर दुरुस्तीचे पत्र १५ दिवसात देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी उद्या १ मार्च रोजी असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी संपर्क साधून येत्या १५ दिवसात छप्पर दुरुस्तीचे पत्र देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने १ मार्च रोजी शाळा रस्त्यावर भरवण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. याबाबतचे निवेदन शिक्षणअधिकारी यांना देखील देण्यात आले होते. परंतु मंगळवारी २८ फेब्रुवारीला शिक्षण अधिकारी यांनी स्वतः फोन करुन सदर छप्पर दुरुस्तीचे मंजुरी पत्र येत्या १५ दिवसात देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे १ मार्च रोजी होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. परंतु पुढील १५ दिवसात मंजुरी पत्र प्राप्त न झाल्यास १६ मार्च रोजी तीव्र आंदोलन करुन शाळा रस्त्यावर भरविण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती यांच्या कडून २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत झाला आहे, अशी माहिती असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत यांनी दिली आहे.