विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी श्रेयवादाची लढाई का ?
मनसे नेते परशुराम उपरकरांचा भाजप- शिवसेनेला सवाल
मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांकडे लक्ष देण्याचा सल्ला
कणकवली (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उदघाटना वरून केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या श्रेयवादाच्या नाट्यावरून मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई- गोवा महामार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र या विमानातून केवळ ७५ प्रवासी येणार आहेत. त्यामुळे ७५ प्रवाशांसाठी श्रेयवाद का ? असा सवाल करून मुंबई- गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रवास निर्धोक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला श्री. उपरकर यांनी भाजप- शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे. कणकवली मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य सरकारच्या वतीने सुरुवातीला ७ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन करणार म्हणून सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून ९ सप्टेंबरला उद्घाटन करणार म्हणून सांगण्यात आले. हा वादंग आणि उद्घाटनाचा श्रेयवाद विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी आहे. मात्र ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो प्रवासी ये-जा करत आहेत, त्या महामार्गाची झालेली दूर्दशा या कोणत्याच राजकीय पक्षाला दिसत नाही का ? केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी याआधी चिपी विमानतळाचं गणेश चतुर्थीला तीन वेळा उद्घाटन केलं. परंतु त्यांना विमानतळ सुरु करता आलं नाही. त्यानंतर सेना-भाजपाचं सरकार सत्तेत आलं. परंतु विमानतळाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. केवळ गणपती आणून जनतेला फसवण्याचं काम या सर्वांनी केलं आणि आजही जनतेला फसवण्याचंच काम केलं जातंय. आज गणेशोत्सवानिमित्त लाखो प्रवासी मुंबई-गोवा हायवेवरून जिल्ह्यात दाखल होत आहेत. परंतु या महामार्गाची स्थिती अतिशय हलाखीची झाली आहे. याकडे केंद्र शासन असो किंवा राज्य सरकार कोणीही लक्ष देत नाही. हायवेच्या प्रश्नांनी जनता हैराण झाली असताना त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. परंतु विमानतळाचा श्रेयवाद घेण्यासाठी यांची धडपड चाललेली आहे. देशाचे राष्ट्रपती जर एका लहान मुलाकडून रस्त्याचं उद्घाटन करून घेत असतील, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊन उद्घाटनाचा घाट मांडण्यापेक्षा आॕनलाईन उद्घाटन करण्यात यावं आणि विमानतळासाठी ज्या लोकांच्या जमिनी कवडीभावाने घेतल्यात त्यामधीलच कोणा जेष्ठ नागरिकाकडून नारळ फोडून शुभारंभ करावा, अशी मागणीही परशुराम उपरकर यांंनी केली आहे.
भाजपाने किरीट सोमय्यांना आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सिंधुदुर्गात पाठवलं. परंतु तेही या हायवेच्या प्रश्नावर का बोलले नाहीत? असा सवाल करून एअरपोर्ट एथोरिटीने हायवेचं काम पूर्ण केलं असलं, तरी ज्या महामार्गावरून सर्वसामान्य लाखो प्रवाशांचा प्रवास होत असतो, तो महामार्ग सुरळीत करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करणं सरकारला जमलं नाही. रस्त्याची कामं करणाऱ्या ठेकेदारांचे दोन वर्ष टेंडर न आल्याने ११३ कोटीची बिलं प्रलंबित आहेत. दोन वर्ष कोणत्याही प्रकारचा निधी रस्त्यासाठी आलेला नाही. बदली आणि निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी अजून भरतीही झालेली नाही. झालेल्या परंतु कोट्यवधीच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. या दोन्ही सरकारला जनतेचं काही पडलेलं नाही. फक्त आमिष दाखवून जनतेला विकासाच्या मुद्द्यापासून विचलीत करायचं काम सरकार करत आहे. विमानतळाचं उद्घाटन होतंय त्याला आमच्या शुभेच्छाच आहेत. परंतु त्याचवेळी सरकारने जिल्ह्यातील रस्त्यांकडेही तेवढ्याच प्राधान्याने लक्ष द्यावं आणि जनतेला दिलासा द्यावा, असे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.