… तर १ मार्चपासून असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवणार !
शाळा दुरुस्ती रखडल्याने पालक आक्रमक ; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या दोन्ही वर्गखोल्यांचे छप्पर मोडकळीस आले आहे. दीड वर्षांपूर्वी शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवूनही अद्याप पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेच्या छप्पर दुरुस्ती बाबत तातडीने निर्णय न झाल्यास १ मार्च पासून असरोंडी कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
असरोंडी नं. १ या शाळेत १४ मुले शिकत असून शाळेच्या २ वर्गखोल्या आहेत. त्यांचे छप्पर पूर्णत: खराब झालेले आहे. या छप्पराच्या दुरुस्तीकरीता गटशिक्षणाधिकारी यांना १४ ऑगस्ट २०२१ पासून दुरुस्ती करीता प्रस्ताव पाठवला जात आहे. मात्र जून २०२२ पर्यंत छप्पर दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे गावातील सर्व पालकांनी मिळून वर्गणी काढून ७००० रुपये रकमेचा प्लॅस्टिक कागद छप्परावर घातला आहे. जेमतेम हे वर्ष गेले. जून २०२३ पासून सदरच्या वर्गात मुलांना बसविणे धोकादायक आहे. त्यामुळे यापुढे मुलांना वर्गात न बसवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेत शाळेच्या छप्पराच्या दुरुस्ती बाबत कोणताही निर्णय होत नसल्याने १ मार्च पासून असरोंडी ते कणकवली मुख्यरस्ता या ठिकाणी पशुवैदयकीय दवाखान्यासमोर शाळा रस्त्यावर भरविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील. त्यामुळे प्रशासनाने १ मार्च पूर्वी शाळेच्या छप्पर दुरुस्ती बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.