गद्दारांना गाडून आगामी निवडणुकीत भगवा फडकवा…

मालवण मधील शिवगर्जना मेळाव्यात सुभाष देसाईंची निष्ठावंत शिवसैनिकांना साद

उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचा निर्धार करण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयुष्यभर विविध पदे दिली, हेच आता गद्दार बनले आहेत. बाळासाहेब २०१२ साली आपल्याला सोडून गेले, तत्पूर्वी २०११ मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना “आता मी थकलोय, आता पूर्वीचा जोश माझ्यात राहिलेला नाही. यापुढे उद्धव, आदित्यला सांभाळा” अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आजही बाळासाहेबांचे शब्द आमच्या कानात घुमतायत. मात्र मिंधे गट स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं विसरला. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी त्यांनी कारस्थाने केली. आज आमचा पक्ष, आमचं चिन्ह त्यांनी चोरलं असलं तरी शिवसैनिक आणि सामान्य जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे. हे कळून चुकल्यानेच मुंबई महानगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका घेण्याचे टाळले जात आहे. मात्र आज ना उद्या या निवडणुका लावल्या जाणारच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत गद्दारांना गाडून भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्या शिवाय आपण गप्प बसणार नाही, अशी शपथ घ्या, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी मालवण येथील शिवगर्जना मेळाव्यात बोलताना केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, प्रदीप बोरकर,यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,बाळ महाभोज, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख शिल्पा खोत, उपतालुकाप्रमुख अमित भोगले,अरुण लाड, विभागप्रमुख बंडू चव्हाण, समीर लब्दे, राजेश गावकर, कमलाकर गावडे, विजय पालव, प्रवीण लुडबे, पूजा तोंडवळकर,शीला गिरकर, सन्मेष परब, तृप्ती मयेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे,कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव सरपंच रणजित परब,तळगाव सरपंच लता खोत,आशिष परब आदींसह दोन्ही तालुक्यातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थामधील शिवसेना लोकप्रतिनिधी, निमंत्रित पदाधिकारी, सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सोसायटी सदस्य तसेच पुरुष व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले, गद्दारांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी शिवसेनेचा विचार त्यांना चोरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हा विचार सर्वसामान्यांच्या हृदयात रुजवला आहे. त्या विचारांपासून शिवसैनिक कधीही दूर जाणार नाही. अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला. वेंगुर्ल्यामध्ये झुलत्या पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असता बंदोबस्तासाठी ५०० पोलीस आणि समोर ५० कार्यकर्ते अशी केविलवाणी अवस्था पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांसारख्यांच्या कार्यक्रमाला ५० लोक येत नसतील तर स्वतःची क्षमता त्यांनी ओळखावी. मिंधे गटाने केलेल्या गद्दारीने सर्वसामान्य जनतेमध्ये देखील प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. जनता आता निवडणुकीची वाट बघत आहे. जेव्हा मतदान होईल त्यावेळी या गद्दारांची धूळधाण होणार आहे. हे समजल्यामुळेच सर्व प्रकारच्या निवडणुका पुढे ढकल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची संपूर्ण जगाने प्रशंसा केली. मात्र त्याच उद्धव ठाकरे यांना अपमानित होऊन पायउतार व्हावे लागल्याने याची मोठी किंमत भाजपाला चुकवावी लागणार आहे. तुम्ही आमचं नाव चोराल, निशाणी चोराल. पण जनता तुम्हाला भीक घालणार नाही. हिंमत असेल तर लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका भाजप आणि मिंधे गटाने घेऊन दाखवाव्यात. आमच्याशी लढण्यासाठी जनतेच्या मैदानात यावे. मग तुमची पात्रता काय आहे ते ही जनता दाखवून देईल. आज संपूर्ण देशात उद्धव ठाकरेंचे नेतृत्व चर्चिले जात आहे. बिगर भाजप राज्यातील अनेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. मागील लोकसभा निवडणुकीत तीनशे जागा मिळवलेल्या भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठणे देखील अशक्य होणार असल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला.

वैभव नाईकांच्या कार्याचं कौतुक

आमदार वैभव नाईक यांच्या कार्याचे सुभाष देसाई यांनी कौतुक केले. जनतेला ठेच लागली तर वैभव नाईकांच्या डोळ्यात पाणी येते. असा आमदार कुडाळ मालवणच्या मतदारांना लाभला आहे. आज केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर दडपण आणण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी ते डगमगणार नाहीत. आज जनतेमध्ये प्रचंड रोष असून गद्दारांना धडा शिकवणारच, ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवगर्जना कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचवावी. भाजपा आणि मिंधे गटाचा सूड जनताच घेणार आहे. तो दिवस आता दूर राहिलेला नाही, असे सुभाष देसाई म्हणाले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कोणी विकास केला असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे ९० टक्के आमदार सोडून गेले. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. तरीही शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ठाकरे ब्रँडची किंमत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले. आता तुम्ही आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी किती चौकशा लावल्या, कितीही त्रास दिला तरी मी शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे. शिवसेनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, सांगितला जाईल तेव्हा निष्ठावंतांच्या नावाची नोंद सुवर्णअक्षरांनी केली जाईल. ठाकरे ठाकरेंनी जो विश्वास आमच्यावर दाखविला, तो सार्थ ठरवणार आहोत. आज आपले मुख्यमंत्री नसतील, पालकमंत्री नसतील तरी लोकांची ताकद आपल्याकडे आहे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी पक्ष संघटना वाढीसंदर्भात आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हरी खोबरेकर यांनी केले. तर मंदार ओरसकर यांनी आभार मानले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!