सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; महाविकास आघाडीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून मंजुरी

मालवण : चक्रीवादळामुळे वीज वितरण विभागाचे दरवर्षी मोठे नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते त्यामुळे सिधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार महाविकास आघाडी सरकारच्या शिफारशी नुसार राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पाअंतर्गत आर. डी. एस. एस. योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्या करण्यासाठी ३५४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यासाठी १२९ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मालवण तालुक्यासाठी ७१ कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत त्यामध्ये १४३ किलोमीटर मध्ये ११ केव्ही लाईन, ६८ किलोमीटर मध्ये ३३ केव्ही लाईन, १५६ किलोमीटर मध्ये एलटी लाईन भूमिगत टाकण्यात येणार आहे. पेंडूर, कुंभारमाठ, आचरा, विरण, मालवण बाजार, रेवतळे, दांडी, मसुरे, वायंगणी, देवबाग या गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या व त्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्रीची कामे करण्यात येणार आहेत.

कुडाळ तालुक्यात ५८ कोटी १० लाख रु मंजूर आहेत. आडेली – आंदुर्ले ४८ किमीमध्ये ३३ केव्ही लाईन, चिपी सबस्टेशन अंतर्गत ३०.५ किमीमध्ये ३३ केव्ही लाईन, पाट २० किमीमध्ये ११ केव्ही लाईन, चिपी सबस्टेशन अंतर्गत १२ किमी मध्ये ११ केव्ही लाईन, व पाट ८० किमीमध्ये एलटी लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पाठपुरावा करून लवकरच हि कामे मार्गी लावली जाणार आहेत. इतरही गावांमध्ये भूमिगत विज वाहिन्या होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!