लोकशाहीला अभिप्रेत असलेलं व्यासपीठ माध्यमांनी उपलब्ध करून द्यावं !
बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या उदघाट्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर
पत्रकारिता ही आरशासारखीच असली पाहिजे. आरसा कधीच खोटे बोलत नाही. आरशासमोर जी वस्तु न्याल किंवा जो चेहरा न्याल, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब त्यात दिसते. आज पत्रकारितेकडूनही तोच भाव अपेक्षित आहे. घडलेली घटना जशीच्या तशी दाखविणे आणि जशी एक बाजू आहे तशी दुसरी बाजू सुद्धा दाखविणे आणि दोन्ही बाजू ऐकून जनतेला त्यांचे स्वतःचे मत तयार करता यावे, यासाठी लोकशाहीला अभिप्रेत व्यासपीठ तयार करुन देण्याचे काम माध्यमांकडून अपेक्षित आहे. हे व्यासपीठ अन्य कुठल्याही बाबींनी प्रभावित नसावे. हाच आरशामागचा खरा भाव आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
ओरोस येथे सोमवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश देतानाच पत्रकारांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे आज उद्घाटन होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलात, याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील जे पहिले वर्तमानपत्र काढले, त्याचे नाव ‘दर्पण’ होते. म्हणूनच त्यांना दर्पणकार सुद्धा म्हटले जाते. हे नाव देताना पत्रकारितेबद्दल त्यांच्या मनात जे भाव होते. ते या नावातूनच स्वयंस्पष्ट होतात. पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. त्यामुळे पत्रकारितेचे व्यासपीठ अन्य कुठल्याही बाबींनी प्रभावित नसावे. हाच आरशामागचा खरा भाव आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करताना हाच भाव अपेक्षित आहे. त्यांच्या नावाने तयार होणाऱ्या या नव्या वास्तुतही सत्याची साधना होईल, अशी मला पूर्ण खात्री आहे, असे सांगून सर्व पत्रकार बंधू-भगिनींना या उदघाटनाच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.