निलेश राणेंच्या दणक्यानंतर रांजनाल्याच्या जोडरस्त्याचे काम सुरु !
माजी खा. राणेंनी मागील आठवड्यात रस्ता ठेकेदाराला १५ दिवसांचा दिला होता अल्टीमेटम
मालवण | कुणाल मांजरेकर
जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली ठाकरे रांजनाल्याच्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने मागील आठवड्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सदरील रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तारकर्ली येथील रांजनाल्याच्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. या विरोधात भाजपाचे पदाधिकारी सुरेश बापार्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत हे काम पूर्ण करण्यासाठी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी मागील आठवड्यात येथे भेट देऊन या कामाची पाहणी केली. यावेळी सदरील काम अपूर्ण असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांच्याकडे नाराजी व्यक्त करत येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळया यादी टाकण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर हे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.