लाठ्या – काठ्या नाहीत, सिंधुदुर्ग पोलिसांच्या हाती चक्क “गुलाबपुष्प”
वैभववाडी : पोलीस म्हटलं की त्यांच्या हातात दिसतात त्या लाठ्या काठ्या आणि बंदुका… मात्र हेच पोलीस चक्क गुलाब पुष्प घेऊन दिसले तर…? सिंधुदुर्गात हे दृश्य दिसून आलंय ते वैभववाडी तालुक्यात ! गणेशोत्सवा निमित्ताने सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचं करूळ चेक नाक्यावर पोलिसांकडून चक्क गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येतंय. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे चाकरमानी देखील भारावून गेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अटी शर्तीचे पालन करून गणेशोत्सवानिमित्त गावी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचे करूळ चेक नाक्यावर पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस का्ँन्स्टेबल के.एल.पडवळ, एस.टी.शिंदे, डी.ए.काशिद, आरोग्य सेवक के.एस.वानोळे, शिक्षक वैभव पाटील, व्ही.के. नानगुरे, कृषी अधिकारी सुधाकर जाधव, कनिष्ठ सहाय्यक-आनंद पिसे, पोलीस मित्र नारायण शिंदे आदी उपस्थित होते. बऱ्याच चाकरमान्यांच्या मनात करुळ चेक नाक्याबद्दल भीती होती. दोन डोस घेतले असतील तरीही टेस्ट केली जाते का ? यात बरेच चाकरमानी संभ्रमावस्थेत होते. परंतु ज्यांचे २ डोस झाले आहेत तसेच ज्यांच्याकडे rt-pcr सर्टिफिकेट असेल त्यांना कोणताही विलंब न करता पोलीस मार्गस्थ करत आहेत. नेहमी हातात काठी घेऊन नाक्यावर दिसणारे पोलिस आज गुलाबपुष्पाने स्वागत करत असल्याने चाकरमानी ही भारावून गेले आहेत.