शासन- प्रशासनाचे दुर्लक्ष ; मात्र पं. स. सदस्याची तत्परता : दीड लाख रुपयांचा रस्ता स्वखर्चातून साकार
सुनील घाडीगावकर यांचे दातृत्व ; ओवळीये सडा धनगरवाडी ग्रामस्थांच्या मार्गातील विघ्न दूर
कुणाल मांजरेकर
मालवण : ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदूळ रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पंचायत समिती सभेत आवाज उठवण्यात आला. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण छेडले. तर आमदार वैभव नाईक यांनी देखील गावाला भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली होती. मात्र तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात शासन- प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीमध्ये ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी स्वखर्चातून सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्चून हा रस्ता साकारला आहे. श्री. घाडीगांवकर यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
ओवळीये सडा-धनगरवाडी ते हेदूळ हा सुमारे ३ ते ४ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला होता. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या येथील धनगरवाडीतील ५० ते ६० कुटुंबांसमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दोन वर्षे शासनाकडे मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्षच केले जात होते. येथील ग्रामस्थानी गतवर्षी जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण छेडले. स्थानिक आमदारही या ठिकाणी येऊन गेले. मात्र शासन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सुनील घाडीगांवकर यांनी स्वखर्चातून सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्चून या रस्त्याची स्वतः दुरुस्ती करून घेत ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खाण उद्योग आहे. काही खाणी अनधिकृत आहेत. अश्या स्थितीत मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वाहतूक होत असल्याने रस्ता नादुरुस्त बनत आहे. मात्र याकडे शासन-प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुनील घाडीगांवकर यांनी केला आहे. याप्रश्नी तहसीलदार अजय पाटणे यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. अनधिकृत खाणींवर कारवाईची मागणी करण्यात आली असून येथील रस्त्याचे लवकरात लवकर खडीकरण डांबरीकरण व्हावे अशी आग्रही मागणी सुनील घाडीगांवकर यांनी केली आहे.