स्वप्न साकारले… खारेपाटण चिंचवली रेल्वे स्थानकांत जल्लोष
रेल्वे स्थानकांत थांबली पहिली ट्रेन : संघर्ष समितीकडून जंगी स्वागत
खारेपाटण वासियांच्या आनंद सोहळ्यासाठी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंतही उपस्थित
वैभववाडी (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावर सुसज्ज बांधण्यात आलेल्या खारेपाटण – चिंचवली रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून छेडलेल्या आंदोलनाचं फलित म्हणून मंगळवारी दिवा पॅसेंजर ही पहिली रेल्वे या स्थानकावर थांबली. यानिमित्ताने खारेपाटण वासियांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. या रेल्वेच्या स्वागतासाठी नूतन रेल्वे स्थानकावर ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष केला. खारेपाटण वासियांच्या या आनंद सोहळ्यासाठी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने हे जंगी स्वागत करण्यात आले. सावंतवाडीहून मुंबईकडे जाणारी दिवा पॅसेंजर ही गाडी सकाळी ११.२२ वा. या रेल्वे स्थानकात दाखल झाली. यावेळी संघर्ष समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या घोषणा देत जयजयकार केला. या ट्रेनचे स्वागत श्रीफळ वाढवून जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तर संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी यांनी पहिल्या ट्रेनला पुष्पहार घातला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, संघर्ष समितीचे सचिव सुर्यकांत भालेकर, चिंचवली सरपंच रुंजी भालेकर, तिथवली सरपंच सुरेश हरयाण, शेर्पे सरपंच निशा गुरव, अनिल पेडणेकर, किशोर माळवदे, विश्वनाथ खानविलकर, श्रीधर गव्हाणकर, समिती सदस्य रवींद्र लाड, संजय लाड, तानाजी भालेकर, सत्यवती गव्हाणकर, जयसिंग भालेकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष नासीर काझी म्हणाले, संघर्ष समिती साठी आजचा दिवस अविस्मरणीय असा राहील. नागरिकांचे २० वर्षांचे स्वप्न सत्यात उतरवण्यात संघर्ष समितीला यश आले आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी या समितीला संघर्ष करण्याची वेळ येणार नाही. लवकरच रेल्वे स्टेशनचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते. त्यांनी शब्द पाळत ही मागणी मार्गी लावली आहे. त्यामुळे राजापूर, कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील जवळपास ६० गावांना हे स्टेशन सोयीचे झाले आहे. स्टेशन चा चांगला फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे. तिथवलीहून रेल्वे स्टेशन कडे जाणा-या सुख नदीवरील ब्रिजचे काम तसेच प्लॅटफॉर्मचे काम संघर्ष समितीच्या माध्यमातून पुढील काळात मार्गी लावले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्टेशन मास्तर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरातील काही प्रवाशांनी आज या स्टेशनवरुन मुंबईकडे प्रवास केला. उपस्थित सर्वांचे संघर्ष समितीचे सचिव सुर्यकांत भालेकर यांनी आभार मानले.