सर्जेकोट पिरावाडी बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनूसार ; हरी खोबरेकर यांची ग्वाही
पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; बंधारा काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी खासदार, आमदार, तालुकाप्रमुखांचे मानले आभार
मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार कमी उंचीचे करण्यात यावे अशा सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
सर्जेकोट पिरावाडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भेट देत स्थानिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बाबी जोगी, रघुनंदन खडपकर, श्री. जामसंडेकर यांच्यासह अन्य स्थानिक मच्छिमार, पतन विभागाचे श्री. चव्हाण, श्री. मोडक उपस्थित होते. स्थानिक मच्छीमारांनी आपल्या होड्या समुद्रात उतरवण्यासाठी तसेच वर काढण्यासाठी बंधाऱ्याची उंची कमी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार श्री. खोबरेकर यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसारच बंधारा कमी उंचीचा करण्यात यावा. यासाठी आराखड्यात आवश्यक तो बदल करावा अशा सूचना दिल्या. यासाठी आवश्यक पाठपुरावा आम्ही करू असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्जेकोट पिरावाडी येथील बंधाऱ्याचे काम मंजूर व्हावे यासाठी आमदार वैभव पायी, खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न करत निधी मंजूर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बंधाऱ्याचे काम मार्गी लागले असून उर्वरित बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करत स्थानिक मच्छीमार ग्रामस्थ यांनी आमदार वैभव पायी, खासदार विनायक राऊत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आभार मानले.