किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले विजयदुर्गच्या प्रतिकृतींचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण

मालवणमध्ये कार्यक्रम ; किल्ले संवर्धनाचे कार्य जन पुढाकारनेही शक्य : मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मालवण | कुणाल मांजरेकर

किल्ल्यांचे संवर्धन हा स्व- जागृतीचा उत्तम उपाय आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्थेने हाती घेतलेल्या किल्ल्यांचे जतन, संवर्धन उपक्रमाला माझा पूर्ण पाठींबा आणि प्रोत्साहन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले. शासन आपल्या गतीने जेव्हा सक्रिय व्हायचं आहे तेव्हा होईल. त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. पण हे कार्य जनपुढाकाराने देखील होऊ शकेल, त्यासाठी आपण हाती घेतलेलं व्रत चालू ठेवा. योग्यवेळी परमेश्वर सुद्धा साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीचे साक्ष देणारे किल्ले विजयदुर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृतींचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते बुधवारी मालवण येथील डॉ. सुभाष दिघे यांच्या भरड वायरी येथील निवासस्थानी करण्यात आले. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्थेने हाती घेतलेल्या किल्ल्यांच्या टू द स्केल’ प्रतिकृती बनविण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. सांगली येथील रमेश बलूरगी यांनी या दोन्ही प्रतिकृती गेली वर्षभर काम करून बनविल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सिंधुदुर्ग जिल्हा माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश नारकर, रत्नागिरी जिल्हा माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र वणजू, एव्हरेस्ट शिखरवीर व जेष्ठ गिर्यारोहक भूषण हर्षे, रत्नागिरीचे जेष्ठ गिर्यारोहक राजेश नेने, सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे पदाधिकारी डॉ. कमलेश चव्हाण, ज्योती बुआ, राजेंद्र परुळेकर, जानराव धुळप यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह प्रसाद आगवेकर, जिल्हा संघचालक रवीकांत मराठे, जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, सहकार्यवाह पवन बांदेकर, डॉ. सुभाष दिघे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अविभाज्य भाग असलेल्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी विविध उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघामार्फत राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून या प्रतिकृती तयार करण्यात येत असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या प्रतिकृती संग्रहालयात मांडण्यात येणार आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला अभिनव पद्धतीने उजाळादेण्याचा मानस आहे, अशी माहिती देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!