मंदार केणी स्वतःची पात्रता ओळखून राणे कुटुंबावर बोला ; आरोप खोटे असतील तर आमने – सामने या !

गणेश कुशेंचे आव्हान ; धामापूर नळपाणी योजनेत १४.२४ कोटी लाटण्याचा आ. नाईक – केणींच्या जोडगोळीचा होता डाव

मालवण | कुणाल मांजरेकर

मंदार केणी यांना ज्या राणे कुटुंबाने राजकारणात मोठं केलं, त्याच राणेना आव्हान देण्याची केणींची भाषा म्हणजे खाल्ल्या ताटात थुंकण्याचा प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धामापूर नळपाणी योजनेसाठी २०१८ मध्ये त्यांनी २८.९२ कोटी मंजूर केले. मात्र अवघ्या दोन वर्षात या योजनेचे २८.९२ कोटींवरून ५४.२४ कोटी करण्याची किमया आमदार वैभव नाईक आणि मंदार केणी या जोडगोळीने करून दाखवली. बहुमताच्या आधारे त्याबाबतचा ठराव देखील मंजूर करून घेत आम्ही मांडलेली उपसूचना फेटाळण्यात आली. मात्र पालिकेच्या या ठरावाला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिल्यानंतर या निविदेची रक्कम १४.२४ कोटीने कमी होऊन ४० कोटींवर आणण्यात आली. त्यामुळे ही वाढीव रक्कम कोणाच्या घशात जाणार होती ? १४ कोटी हातातून गेले, निदान उर्वरित ४० कोटीत तरी स्वतःच्या हाताला काहीतरी लागावे यासाठी आता वैभव नाईक, मंदार केणी यांचे प्रयत्न सुरु आहेत, असा जोरदार आरोप भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर आपले पितळ उघडे पडण्याच्या भीतीने मंदार केणी यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आमचे आरोप खोटे असतील तर मंदार केणी यांनी आमच्या सोबत आमने सामने येण्याचे आव्हान स्वीकारावे, असेही गणेश कुशे यांनी म्हटले आहे.

मालवण येथील भाजपा कार्यालयात गणेश कुशे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी भाजपा नेते निलेश राणेंच्या पालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दिलेल्या खुलाशाचा समाचार घेतला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, ममता वराडकर, पूजा सरकारे, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, मोहन वराडकर, अरुण तळगावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.माजी खासदार निलेश राणे यांनी धामापूर नळपाणी योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर आमदार वैभव नाईक आणि मंदार केणी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच केणी धातूर मातुर उत्तरे देऊन नळपाणी योजेनेत भ्रष्टाचार झालाच नाही, असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. धामापूर नळपाणी पुरवठा योजना शहराच्या विकासासाठी आणि मालवणच्या जनतेसाठी आहे. जी अवस्था शहरातील भुयारी गटार योजनेची झाली, ती अवस्था पाणी पुरवठा योजनेची होऊ नये ही भाजपाची पूर्वीपासूनच प्रामाणिक भूमिका राहिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी २०१८ मध्ये २८.९२ कोटी मंजूर करण्यात आले. त्याची निविदा काढण्यात आली, तेव्हा ६८ % वाढीव दराने ही निविदा काढली गेली. त्यामुळे ही निविदा रद्द करून २२ डिसेंबर २०२० रोजी सहसचिव नगर विकास विभाग यांनी अंदाजपत्रकाची नव्याने फेरतपासणी करून सुधारित तांत्रिक मंजुरी दिली. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आमदार वैभव नाईक आणि मंदार केणी यांनी मुंबई येथे नगरपालिकेने नेमलेल्या प्रकल्प सल्लागाराला गाठले आणि त्याच्याकडून ५४.२४ कोटींचा आराखडा जबरदस्तीने तयार करून घेतला. ज्याच्यावर त्या सल्लागाराचा शिक्का व सही नव्हती. ही बाब नगरपालिका प्रशासनाने २२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या नगरपालिका सभेकरिता दिलेल्या प्रशासकीय टिप्पणीत नमूद केली आहे.

धामापूर नळपाणी योजनेची मूळ रक्कम होती २८.९२ कोटी, पण केवळ दोन वर्षात या रकमेचे ५४.२४ कोटी झाले. २२ फेब्रुवारी २०२१ च्या सभेत ५४.२४ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. यावेळी आम्ही या ठरावाला विरोध करत आमची उपसूचना मांडली. नळपाणी योजनेच्या दुरुस्तीला आमचा विरोध नव्हता, तर जादा रकमेने ही योजना मंजूर करण्याला आम्ही विरोध दर्शविला होता. मात्र बहुमताच्या बळावर नगरपालिकेच्या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. २१ मार्च २०२२ रोजी मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार नगरपालिकेच्या या ठरावाचा पुनर्विचार व्हावा म्हणून दाद मागितली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कामाला ४० कोटींची तांत्रिक मान्यता देण्यात आली. यामुळे या नळपाणी योजनेच्या दुरुस्तीच्या कामात तब्बल १४.२४ कोटी रुपये कमी झाले. ही रक्कम कोणाच्या खिशात जाणार होती ?

आमच्या विरोधामुळे सुमारे १५ कोटी हातातून गेले. आता किमान उर्वरित रकमेत तरी आपल्या हाताला काहीतरी लागेल, यासाठी वैभव नाईक, मंदार केणी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र निलेश राणे यांनी याचा पूर्ण अभ्यास करून त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय आम्ही होऊ देणार नाही, असेे गणेश कुशे यांनी सांगून मालवणची जनता आमदार वैभव नाईक आणि मंदार केणी यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गणेश कुशे यांनी दिला आहे.

मंदार केणी हे मुख्याधिकाऱ्यांचे पीए असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या नगरसेवक पदाची मुदत संपून एक वर्ष उलटून गेल्यानंतरही नगरपालिकेच्या प्रशासकीय कामात त्यांची ढवळाढवळ संपलेली नाही. त्यामुळे मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची लवकरात लवकर उचलबांगडी करावी अशी मागणी आम्ही पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. मंदार केणी यांचा शहरातील अन्य कामांतही हस्तक्षेप असल्याचा आरोप गणेश कुशे यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!