धामापूर नळपाणी योजनेच्या मंजूर न झालेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निलेश राणेंकडून “जावई शोध” !

मंदार केणी यांचे प्रत्युत्तर ; योजनेचे रि-टेंडर होणार असल्याची माहिती मिळाल्याने श्रेयासाठी राणेंचं राजकारण

योजना ४० नव्हे तर ४३ कोटींची ; पूर्ण माहिती घेऊन निलेश राणेनी बोलण्याचाही दिला सल्ला

धामापूर नळपाणी योजनेच्या नूतनीकरणाला निलेश राणेंचा पूर्वीपासूनच विरोध ; ठरावाला विरोध करण्याचा स्वतःच्या नगरसेवकांना दिला होता आदेश

मालवण | कुणाल मांजरेकर

धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटींच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. मुळात असे आरोप करताना त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलणे आवश्यक होते. हे टेंडर ४० कोटींचे नसून ४३ कोटींचे आहे. या कामासाठी नगरपालिकेने चार वेळा निविदा प्रक्रिया करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. एक टेंडर अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ७० टक्के ज्यादा दराने आल्याने ते रद्द करण्यात आले. आता हे टेंडर झाल्यानंतर तांत्रिक कारणामुळे नगरपालिकेने सदरचे टेंडर रद्द करत रि- टेंडर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना मंजूर न झालेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा “जावई शोध” निलेश राणे यांनी लावला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी धामापूर नळपाणी योजनेची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. मात्र या टेंडरला मुळातच निलेश राणेंचा पूर्वीपासून विरोध असून यामुळे त्यांच्याकडून यापूर्वीही त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना हे टेंडर मंजूर होता नाही, अशी तंबी देण्यात आली होती, असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केला. आता नगरपालिकेनेच रि-टेंडरचा निर्णय घेतल्याने याचे श्रेय स्वतःला घेण्यासाठी निलेश राणेंकडून हे राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले.

मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नरेश हुले, सचिन गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. धामापूर नळपाणी योजनेतील त्रुटी दूर करून ही नळयोजना नगरपालिकेकडे हस्तांतरित करा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार ही नळपाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नगरपालिकेकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर या योजनेचा सुधारित डीपीआर नगरपालिकेकडे आला. त्या डीपीआरला मंजुरी देताना ततकालीन पाणीपुरवठा सभापती राजन वराडकर आणि भाजपा नगरसेवकांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. मात्र भाजपच्याच काही नगरसेवकांनी ही योजना शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने ठरावाच्या विरोधात मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. निलेश राणे यांच्याकडून आदेश आहेत की हा ठराव सभागृहात होऊ नये म्हणून आम्ही ठरावाच्या बाजूने मतदान करू शकलो नाही. मात्र तटस्थ राहून आम्ही आमची मुक संमती या ठरावाला दिल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी आमच्याकडे स्पष्ट केले होते. त्यामुळे धामापूर नळपाणी योजनेच्या नूतनीकरणाला निलेश राणे यांचा पूर्वीपासून विरोध होता. ही योजना पूर्ण होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु आमदार वैभव नाईक व आमच्या नगरसेवकांनी प्रशासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा पाठवली. त्यानुसार या कामाला ४० कोटींची मान्यता मिळाली. परंतु पाईपलाईनचे दर वाढल्याने ही रक्कम ४३ कोटींवर गेली. कुठलीही निविदा भरताना काम मंजूर झालेल्या ठेकेदाराचा पूर्व कामाचा अनुभव विचारात घेतला जातो. या कागदपत्राच्या पडताळणीत या ठेकेदाराकडे काही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे दिसल्याने हा ठेका रद्द करून धामापूर नळपाणी योजनेचे रि-टेन्डर करण्याची प्रक्रिया प्रशासन पातळीवरून हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मुळात जे टेंडर झालेच नाही, त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निलेश राणे कोणत्या आधारे करत आहेत ? असा सवाल मंदार केणी यांनी केला.

ही नळपाणी योजना वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून दुरुस्त होत आहे. आज मालवण शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज धामापूर नळपाणी योजना अनेक ठिकाणी लिकेज असून नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे. तसेच पाण्याला गळती होऊन नगरपालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे या नळपाणी योजनेचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी प्रशासनाचे आणि आमचेही प्रयत्न सुरू आहेत. असे असताना या नळपाणी योजनेचेे श्रेय आमदार वैभव नाईक यांना मिळू नये आणि शहरवासीयांमध्ये गैरसमज निर्माण याकरिता, याकरिता निलेश राणेंकडून खोटे आरोप केले जात आहेत. आपले आरोप निलेश राणेंनी सिद्ध करावेत असे सांगून खासदारकी भूषविलेल्या माणसाने अशा खालच्या थराला जाऊन आरोप करणे चुकीचे आहे. जिल्हा नियोजन मधून वर्षभरापूर्वी देण्यात आलेल्या ५० लाख रुपयातून मालवण शहरातील काही रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाचा ठेकेदार कोण आहे, याची माहिती घेऊन सदरील कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी पत्र निलेश राणे नगरपालिकेला देणार का ? असा सवालही मंदार केणी यांनी उपस्थित केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!