आंगणेवाडी यात्रा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात घेणार देवीचे दर्शन

आंगणेवाडीच्या भूमीतून मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा विकासाचे गाऱ्हाणे मांडणार

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती

ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर, ना. दादा भुसे, ना. शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे मुख्यमंत्री यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या समवेत राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्ह्यात येत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून जिल्हा विकासाचे साकडे घालणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. मुख्यमंत्री निश्चितच सिंधुदुर्गसाठी भरभरून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मालवण चिवला बीच येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, महिला तालुकाप्रमुख सोनाली पाटकर, कविता मोंडकर, हर्षद पारकर, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, राजा तोंडवळकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुधीर सावंत म्हणाले, मुख्यमंत्री आंगणेवाडी यात्रेस सकाळच्या सत्रात उपस्थित राहणार असून हेलिकॉप्टरद्वारे त्यांचे आगमन होणार आहे. याबाबत आंगणेवाडी येथे भेट देऊन आढावा घेण्यात आला. यावेळी आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाशी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवीच्या दर्शनानंतर यात्रेतील पक्षाच्या कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आंगणेवाडीत साजरा होणार

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस ४ फेब्रुवारी रोजी आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आंगणेवाडीत पक्ष कार्यालयात हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे, असेही श्री. आग्रे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच रखडलेले प्रकल्प याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतील, पर्यटनातून येथील जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध कसा होईल, देवबाग येथील त्सुनामी आयलंड वाचविण्यासाठी काय करता येईल तसेच किनारपट्टीची धूप होण्यापासून संरक्षण करणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री याबाबत नक्कीच ठोस निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करतील तसेच मुख्यमंत्र्यांची ही भेट जिल्ह्यासाठी लाभदायी ठरेल, असा विश्वासही सुधीर सावंत, संजय आंग्रे यांनी व्यक्त केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!