मालवण मधील नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच ; महेश कांदळगावकर यांनी केली मदत

वीज मंडळाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील धुरीवाडा येथे शुक्रवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत शिलाई मशीन दुरुस्ती व टेलरिंग अशी दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये दुकानमालक विलास परुळेकर तसेच टेलरिंग व्यावसायिका सौ. मृणाल मोंडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आमदार वैभव नाईक, माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या मदतीनंतर मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही सौ. मोंडकर व श्री. परुळेकर यांना मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत सुपूर्द केली. या नुकसानग्रस्तांना वीज मंडळाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. कांदळगावकर यांनी दिली आहे.

या आगीत परुळेकर यांच्या मालकीची दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये ते स्वतः चालवत असलेले शिलाई मशीनचे दुकान भस्मसात झाले. तर त्यास लागूनच असलेले सौ. मृणाल मोंडकर यांचे टेलरिंगचे दुकान जळून खाक झाले. यात शिलाई मशिन्स, इतर साहित्य व ग्राहकांचे कपडे जळून नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे या दोघांवरही आर्थिक संकट कोसळले असून पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दोघाही नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, भाई कासवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!