कणकवली शहरातील विकास कामात विरोधकांकडून घाणेरडं राजकारण !
नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे गटनेते संजय कामतेकर यांचा आरोप
विकास कामात राजकारण केल्यास कदापी गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा
कणकवली | मयुर ठाकूर :
उन्हाळ्याच्या दिवसांत कणकवली तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याची मोठी समस्या जाणवते. ही समस्या लक्ष्यात घेत पाईपलाईन साठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडून प्रयत्न करून ती कामे मंजूर करून सुरू करण्यात आली. मात्र निवडणुका नजरेसमोर ठेऊन विरोधी पक्षाचे नगरसेवक व राजकीय मंडळी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत न करता फक्त कामांना विरोध करण्यासाठी आली. जनतेच्या समस्या लक्षात न घेता आरोप करायचे आणि विकास कामांना पाठिंबा न देता निवडणूका नजरेसमोर ठेऊन घाणेरड राजकारण करायचं अशा पद्धतीचा कारभार विरोधी नगरसेवकांचा आणि राजकीय नेतेमंडळीचा सुरू असल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
कणकवली नरडवे रोड रेल्वे स्टेशनजवळचा मुख्य महामार्ग पाईपलाईनकरिता खोदला होता. त्यातून पाईपलाईन करून माती टाकून खोदाई केलेला चर बुजविण्यात आला होता. रस्त्याचे पुढील डांबरीकरण थांबविण्यात आले होते. कारण त्या चरातील माती पूर्णपणे जाम झाल्यावर त्यावर खडीकरणाच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र अलीकडेच त्या ठिकाणची माती खचू लागली. पाण्याच्या ओव्हरलोड प्रेशरमुळे पाईपलाईन फुटली आणि त्यातून पाणी बाहेर येऊन त्याठिकानील माती ओली होऊन चर खचू लागला. याबाबतची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर प्रकारची माहिती ठेकेदार जावेद शेख यांना देण्यात आली. ठेकेदार जावेद शेख देखील JCB घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले. पुन्हा त्या चराची खोदाई करून पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मात्र याचवेळी विरोधकांनी येऊन जनतेच्या वेळोवेळी सहकार्याला धावणाऱ्या टीम वर होऊ केले. त्यामुळे तोडीस तोड देण्यासाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला आक्रमक होऊनच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान राखून मध्यस्थी करून तापलेले वातावरण थांबविले व पुढील काम सुरू केले. या घटनेतून विकास कामांमध्ये श्रेय घेण्यासाठी विरोधकांची तळमळ असल्याचे चित्र त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून व बोलण्यावरून दिसून येत असल्याचा आरोप हर्णे यांनी केला.
नगराध्यक्ष नलावडे म्हणाले, मागील पावणे पाच वर्षाच्या कारकिर्दीत विरोधी गटाला कोणत्याही प्रकारे आरोप करण्यासारखं काम आम्ही केलेले नाही. जे काय असेल ते काम पारदर्शकपणे केलेल आहे. विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचं घाणेरडे राजकारण आमच्या सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही. मात्र निवडणुका नजरेसमोर ठेवून विरोधीकांकडून हे घाणेरडे राजकारण केलं जात आहे. जर आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला सांगा. त्या ठेकेदाराचं काय चुकलं असेल तरही देखील सांगा. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर हे घाणेरडे राजकारण करू पाहत असाल तर ते आम्ही कदापिही शक्य होऊ देणार नाही. असा इशारा देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, ठेकेदार जावेद शेख, नगरसेवक तथा गटनेते संजय कामतेकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.