गणेश कुशेंच्या निष्क्रियपणा मुळेच मेढा भागाचा विकास रखडला

महेश जावकर यांचा पलटवार ; पद असो वा नसो जनतेसाठी संघर्ष करणे हाच माझा पिंड

मालवण | कुणाल मांजरेकर

मेढा भागातील रस्तांच्या डांबरीकरणावरून शिवसेनेचे स्थानिक नेते माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर आणि भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. श्री. जावकर यांनी या रस्त्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला निवेदनाद्वारे दिल्यानंतर कुशे यांनी जावकर यांच्यावर टीका केली होती. त्याला आता महेश जावकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गणेश कुशेंच्या निष्क्रियपणा मुळेच मेढा भागाचा विकास रखडला आहे. पद असो वा नसो जनतेसाठी संघर्ष करणे हाच माझा पिंड आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत श्री. जावकर यांनी म्हटले आहे की, गणेश कुशे यांनी पाच वर्षात स्वतःच्या क्लास जवळील फोवकांडा पिंपळ ग्रामीण रुग्णालयचा रस्ता का नाही केला ? आपले अपयश लपवण्यासाठी प्रशासकीय राजवटीचे कारण ते पुढे करत आहेत. तेव्हा जनतेची दिशाभूल करणे थांबवा. जनता सुज्ञ आहे. जय गणेश मंदिर ते राजकोट रस्ता सहा महिन्याच्या कालावधीतच रस्ता खड्डेमय झाला हाच काय तो विकास ? आपण विकासाच्या वल्गना करू नये. मालवण शहराला आमदार वैभव नाईक यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. बहुतेक रस्ते त्यांनी आणलेल्या निधीतूनच झालेले आहेत. परंतु आपल्या निष्क्रियपणामुळे मेढा भागाचा विकास रखडलेला आहे. निवडणुकीत मते विकत घेऊन निवडून येणारे कुशे विकास काय करणार ? माझ्याजवळ पद असो वा नसो जनतेसाठी संघर्ष करणे हा माझा पिंड आहे. त्यामुळे तोक्ते वादळ, कोरोना महामारीत आपण जनतेसोबत होतो. तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपून होता ? केवळ नगर परिषदेत राजकीय उणेधुणे व स्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक गणित सोडवण्यात मग्न होता. पाच वर्ष यातच निघून गेली. आपण काय विकास केला आणि करणार ? येणाऱ्या दिवसात कोणाला डराव डराव करायला लावणार हे लवकरच दिसेल, असे सांगून जो रस्ता मंजूर झाल्याची शेखी ते मिरवत आहेत, त्याची अद्याप वर्क ऑर्डर देखील झालेली नाही, असे महेश जावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!