वाद उफाळला ; बाळासाहेबांच्या जयंतीलाच शिंदे गटाच्या कार्यालयाला टाळे !
मालवण मधील घटना ; पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ; बॅनरही फाटला
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच शिंदे गटातील वाद उफाळल्याची घटना मालवणात घडली आहे. पक्षीय वादातून पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पक्षाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या जयंती दिनी फोटोला हार घालण्यावरून हा वाद झाल्याचे समजते. मालवणात तीन तीन तालुकाप्रमुख कार्यरत असून पक्ष पातळी वरून या वादावर तोडगा काढावा, त्यानंतरच कार्यालय सुरु करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते.
मालवणमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात काही दिवस अंतर्गत वाद धुमसत आहेत. या वादाचा स्फ़ोट सोमवारी बाळासाहेेब ठाकरे यांच्या जयंती दिनी झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम शिंदे गटाच्या मालवण कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी फोटोला हार घालण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. या वादामुळे कार्यालय बंद करण्याचा निर्णय जागा मालकाने घेतला. मालवण मध्ये शिंदे गटाचे तीन तालुकाप्रमुख कार्यरत आहेत. त्यातून हे वाद निर्माण होत असून जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कार्यालय सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ऐन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीलाच शिंदे गटाचे कार्यालय बंद झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
बॅनर फाटल्याने संभ्रम
बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये वादवादी होऊन कार्यालयाला टाळे पडल्याचा प्रकार घडला असताना कार्यालयाच्या बाहेरील पक्षाचा फलक देखील फाटल्याचे दिसून आले. त्यामुळे भांडणातून हा फलक फाडण्यात आला की अन्य कारणाने फाटला, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या.