आ. वैभव नाईक आणि कंपूने श्रेयवादाची नौटंकी करू नये !
धोंडू चिंदरकर : सत्तेत असताना काही करू शकला नाही, मग आता आंदोलने, निवेदने देऊन काय करणार ?
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक आणि कंपनी आता प्रत्येक काम आपल्यामुळेच होत आहे अशी शेखी मिरवत आहेत. परंतु विकासकामे कोणामुळे होतात, हे येथील जनता जाणून आहे. तुम्ही सत्तेत असताना काही करू शकला नाही, ते आंदोलन आणि निवेदने देऊन काय करणार ? असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी करत आमदार वैभव नाईक आणि कंपूने श्रेयवादाची नौटंकी करू नये, असा सल्ला दिला आहे.
अलीकडे विकास कामांवरून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात श्रेयवादाची लढाई होताना दिसून येत आहे. यावरून भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे. कॅबिनेट मिटिंग झाली की तेथील माहिती मिळवायची, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यां कडून तेथील माहिती घ्यायची आणि स्टंटबाजी करायची या पलीकडे यांच्याकडे काहीही नाही. आता फक्त निवेदन देणे आणि मंजूर कामाचं श्रेय घेणे एवढंच काम आता बाकी आहे. आंगणेवाडी जवळ जाणारे सगळे रस्ते नूतनीकरण करण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या रस्त्याची कामे पूर्णत्वास जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक काम पूर्णत्वास जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांनी एक्शन प्लॅन तयार केलेला आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचं काय करायचं त्याचाही प्लॅन तयार आहे, त्यांचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येत जाईल. आमदार कंपुने फक्त आता स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी, जिल्ह्यातील विकास कामाची काळजी घेण्यास भाजपा समर्थ आहे, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.