होतकरू व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी !

शिरवल ग्रामपंचायत येथे आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिरात मंजुषा परब यांचे प्रतिपादन

कणकवली I मयुर ठाकूर :

होतकरू व्यक्तींना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शासनाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी वीस लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. या कर्जांवर ३५ टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा नोंदणीकृत असलेल्या सोसायटीला आणि सहकारी संस्थांना किंवा रजिस्टर कंपन्यांना ही योजना लागू होत असल्याने त्याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा, असे प्रतिपादन लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा खादी-ग्रामउद्योग व्यवसायिक प्रशिक्षण सहयोगी मंजुषा परब यांनी केले.

सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या वतीने लक्षपूर्ती वेल्फेअर फेडरेशन आणि गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड, डहाणू याच्या सहयोगाने कणकवली तालुक्यातील शिरवल ग्रामपंचायत मध्ये स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खादी आणि ग्रामउद्योग आयोगाचे अधिकारी अखिल कौशिल, श्रीपाद दामले, उदय बराटे, लक्षपूर्ती वेल्फेअर फेडरेशनच्या उपाध्यक्षा संगिता कदम, विश्वस्त मनिषा भोयर, सरपंच सौ.गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे, उद्योजक तथा कार्यक्रमाचे आयोजक शंकर पार्सेकर,सिमा पार्सेकर, ग्रामसेवक वर्षा कदम,ग्रामसंघ अध्यक्षा रसिका शिरवलकर,सी.आर.पी.सारीका‌ गुरव, सदाशिव आळवे आदी उपस्थित होते.

यावेळी मंजुषा परब म्हणाल्या की, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन २०१९ पासून वेगवेगळ्या प्रशासना बरोबर जोडले गेले आहे. मुंबई आणि पनवेल महानगरपालिकांमध्ये खादी- ग्रामोद्योगाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन विविध योजना राबवून ६०० बचतगटांचे सक्षमीकरण केले आहे..ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी, खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क, स्थानिक साधन संपत्तीचा वापर करुन ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.असे त्यांनी सांगितले.

खादी ग्रामोद्योग आयोगाचे अधिकारी अखिल कौशिल म्हणाले, खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे घेण्यात येतात. विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे सूक्ष्म उद्यम उभारण्यासाठी पहिल्या पिढीच्या उद्योजकांना सक्षम बनविणारी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यान्वित असलेली प्रधानमंत्री रोजगार योजना व खादी आयोगाची आर.ई.जी.पी. मार्जिन मनी योजना या दोन्ही योजना एकत्रित करुन ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेष घटक योजना, कारागिर रोजगार हमी योजना, मध उद्योग, हातकागद उद्योग प्रशिक्षण, मधमाशा पालनास लागणारे साहित्य बनविण्यासाठी कार्यशाळा, ग्रामोद्योग वसाहत, वन आणि खनीज, शेतमालावर आधारीत उद्योग आणि वस्त्रोद्योगासाठी देखील मंडळातर्फे प्रोत्साहन देण्यात येते.या योजनांच्या माध्यमातून आपला विकास साधा आणि आपले सक्षमीकरण करा, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रविण तांबे यांनी तर सूत्रसंचालन सुनील कुडतरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य लवू तांबे, प्रचिती कुडतरकर चैताली पांचाळ, प्रिती सावंत ,अनुष्का सावंत यांच्यासह शिरवल गावातील महिला बचत गटांचे अध्यक्ष, सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!