भरधाव डंपरची पादचाऱ्याला मागून धडक ; पादचारी गंभीर
काळसे होबळीचा माळ येथील दुर्घटना ; अपघातानंतर डंपर सोडून चालकाचे पलायन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण – कुडाळ मार्गावरील काळसे होबळीचा माळ येथे सातेरी मंदिर नजीक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणारे पादचारी रवींद्र शांताराम सरमळकर (वय -६०) यांना कुडाळ ते चौके या दिशेने वाहतूक करणाऱ्या (क्र. एम एच ०७- पी. ५९७०) या भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला जात मागून ठोकरले. या अपघातात रवींद्र सरमळकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी ४.३० वाजता झाला. अपघातानंतर डंपरचालक आपल्या ताब्यातील डंपर तेथेच सोडून पळून गेला.
घटनास्थळी उपस्थित सौ. दिपीका म्हापणकर, सौ. सीमा पेंडूरकर, विजय म्हापणकर, किशोर पेंडूरकर आणि स्थानिक तरुणांनी तातडीने रवींद्र सरमळकर यांना अधिक वैद्यकीय उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल चव्हाण आणि पोलीस हवालदार सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत अपघाताचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील विनायक प्रभु, काळसे सरपंच विशाखा काळसेकर , उपसरपंच अनिल सरमळकर , सदस्य मोनिका म्हापणकर, निवृत्त पोलीस अधिकारी संतोष वालावलकर आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस डंपर चालकाचा शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान या अपघातानंतर पुन्हा एकदा काळसे धामापूर गावातून लोकवस्तीमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतीरोधक घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.