फोवकांडा पिंपळ ते मेढा रस्त्याचे डांबरीकरण करा ; अन्यथा आंदोलन छेडणार

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पालिकेला इशारा ; अन्य समस्यांकडेही वेधले लक्ष

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील मेढा भागातील फोवकांडा पिंपळपार – ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक शिवसेना नेते, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही दिला आहे.

यावेळी महेश जावकर यांच्या समवेत शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, बंड्या सरमळकर, नितीन मांजरेकर, राजू जोशी, सचिन गिरकर, बाबू वाघ आदी उपस्थित होते. यावेळी महेश जावकर यांनी फोवकांडा पिंपळपार – ग्रामीण रुग्णालय रस्त्याच्या अवस्थे बाबत मुख्याधिकऱ्यांचे लक्ष वेधले. मालवण शहरातील बहुतेक गल्ली, बोळातील रस्यांची डांबरीकरणाची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतू मेढा विभागातील ग्रामीण रुग्णालय ते सादले तिठा या महत्वाच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे पादचारी, रिक्षा, टू व्हीलर, चार चाकी वाहन धारकांना त्रास सोसावा लागत आहे. तसेच हा रस्ता ग्रामीण रुग्णालयाजवळ जात असल्याने मेढा, राजकोट येथील नागरीक आजारी माणसाला याच रस्याचा वापर करतात. तसेच हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या मार्गावरून जय गणेश मंदीर, कोर्ट, तहसिलदार कार्यालय, पोलीस स्टेशनलाही जाणारा हा मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते. त्यामुळे सदरील रस्ता डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अक्षम्य दूर्लक्षपणा करत असल्याने हा रस्ता खड्डेमय राहिला आहे. तरी सदरील रस्ता तातडीने डांबरीकरण करण्यात यावा, नाहीतर तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे यावेळी महेश जावकर यांनी सांगितले. याबाबत योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे काम करू असे यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी सांगितले.

मालवण शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला असून यामुळे वाहनचालक तसेच पर्यटकांना त्रास होत आहे. त्यामुळे गुरे मालकांना आपली गुरे सांभाळण्याबाबत नगरपालिकेने सूचित करून प्रसंगी कारवाई करावी अशी मागणी महेश जावकर यांनी केली. बोर्डिंग ग्राउंड येथे बसविण्यात आलेल्या ओपन जिमचे काही साहित्य नादुरुस्त बनले असून त्याबाबतही लक्ष देऊन साहित्य पूर्ववत करावे अशी मागणीही जावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!