वाचाळवीर संजय राऊत यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार
मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा ; पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर
… म्हणून निलेश राणे यांना राग अनावर ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी “त्या” व्हिडीओ मागील भावना केली व्यक्त
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. आम्हा कार्यकर्त्यांसाठी ते दैवत असून त्यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मालवण पोलीस निरीक्षकांना दिला आहे.
खा. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवीगाळ केली होती. या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणात पोलीस निरीक्षक विजय यादव यांना निवेदन सादर करून आपल्या भावना मांडल्या. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, गणेश कुशे, ममता वराडकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, महेश मांजरेकर, महेश सारंग, भालचंद्र राऊत, आबा हडकर, ललित चव्हाण, राकेश सावंत, निशय पालेकर, विक्रांत नाईक, राज कांदळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
… म्हणून निलेश राणे यांना राग अनावर !
निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ त्यांच्या अटकेसाठी निवेदने दिली जातात. मात्र निलेश राणे यांचे वडील गेली ५० वर्षे राजकीय जीवनात कार्यरत आहेत. आज ते देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. अशावेळी स्वतःच्या वडिलांना कोणीही काहीही बोललेलं मुलगा म्हणून सहन न झाल्याने निलेश राणे यांचा राग अनावर होऊन त्यांनी “तो” व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे संजय राऊत या वाचाळवीरावर कारवाई झाली पाहिजे. भाजपवर दहशतवादाचा आरोप करणारी शिवसेनाच या दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप अशोक सावंत, बाबा परब, अशोक तोडणकर, विजय केनवडेकर यांनी केला. जिल्ह्यात काही उपटसंबू भाजपा आणि राणे कुटुंबावर गरळ ओकत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत “मी तेथे असतो तर कानशिलात लगावली असती” असं वक्तव्य केल्यानंतर त्यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक केली, मग हाच न्याय संजय राऊत यांना लावण्यात यावा, अशी मागणी अशोक सावंत यांनी केली.