मालवणात मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी नगराध्यक्षांनी पुन्हा डागली तोफ !

ठेकेदारांच्या रनिंग बिलासाठी दिसणारी आग्रही भूमिका विकास कामांसाठी दिसत नसल्याची टीका

महेश कांदळगावकर यांनी आडारी गणपती मंदिराकडील साफसफाई स्वखर्चाने केली पूर्ण

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून ठेकेदारांच्या रनिंग बिलासाठी दिसणारी आग्रही भूमिका विकास कामांसाठी दिसत नसल्याची टीका करतानाच शहरातील विकास कामे एकतर बंद आहेत, किंवा धिम्या गतीने सुरु आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मुख्याधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसून ज्याप्रमाणे ते ठेकेदारांच्या रनिंग बिलासाठी आग्रही भूमिका घेतात, तशी भूमिका विकास कामे पूर्ण करण्यासाठी घेताना दिसत नाहीत, असा आरोप श्री. कांदळगावकर यांनी केला आहे. दरम्यान, आडारी गणपती मंदिराकडे २० लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले. मात्र चार महिन्यांपूर्वी तक्रार करूनही येथील साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने श्री. कांदळगावकर यांनी स्वखर्चाने येथील साफसफाई करून घेतली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, आडारी गणपती मंदिर येथे आमच्या कालावधीत सुमारे २० लाख रुपयांचे सुशोभीकरणचे काम करण्यात आले होते. जेणे करून त्याठिकाणी स्थानिक लोकांबरोबर पर्यटक पण आकर्षित होतील आणि रोजगाराची संधी पण स्थानिकांना उपलब्ध होऊ शकेल. परंतु मागील वर्षभर याठिकाणी देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. आणि याबाबत स्थानिक लोकांच्या तक्रारी नुसार सुशोभीकरणाच्या ठिकाणी साफसफाई करण्याबाबत सप्टेंबरमध्ये तक्रार देऊनही आज चार महिने उलटून गेले तरी ते काम केलं गेलं नाही. याठिकाणी EECL कंपनी कडून बसविण्यात येणाऱ्या लाईट आजमिती पर्यत बसविण्यात आल्या नाहीत. बसविण्यात आलेल्या लाईटला कव्हर नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात आलेल्या बऱ्याच लाईट बंद आहेत. बसण्यासाठी बसविण्यात आलेले बाकडे मोडकळीस आलेले आहेत. पण याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. असलेल्या सुशोभीकरणाची देखभाल करता येत नसताना सध्या फक्त शासनाचा निधी खर्च करण्यासाठी सेल्फी पॉईंटच्या नावाखाली काम उरकण्याचा प्रकार कश्यासाठी सुरू आहे हा एक प्रश्न आहे.

आमच्या कालावधीत मंजूर असलेली भाजी मार्केट, अग्निशमन इमारत, न. प. आवार सुशोभीकरण, नाट्यगृहा नजीक मल्टिपर्पज एसी हॉल, सफाई कामगार निवासस्थान, भुयारी गटार योजना, इत्यादी विकास कामे आज एक तर बंद आहेत. किंवा धीम्या गतीने सुरू आहेत. वारंवार लेखी तक्रार करूनही या बाबत कुठलीही दखल घेतली जात नाही. मुख्य अधिकारी यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. अशी परिस्थिती मालवण न. प. ची झालेली आहे. मुख्य अधिकारी ज्याप्रमाणे काँट्रॅक्टरच्या रनींग बिलासाठी आग्रही भूमिका घेतात, तीच भूमिका विकासकामे पूर्ण करण्यासाठी दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्या कालावधीत मालवण शहराच्या विकासासाठी आमच्या आमदार , खासदार यांच्या मार्फत पाठपुरावा करून मंजूर करून आणलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमच्याच लोकप्रतिनिधीना उपोषण करण्याची पाळी येत आहे ही शोकांतिका आहे.

स्ट्रीट लाईट स्वच्छता, स्वच्छता विषयक कामे, बंद असलेल्या खत निर्मितीच्या बायो कंपोस्ट मशीन, बायो टॉयलेट गाड्या या बाबत वारंवार सूचित करूनही कुठलीही दखल मुख्य अधिकारी यांनी घेतलेली नाही. न. प. च्या व्हॉटसअप ग्रुपवर टाकलेल्या तक्रारीची दखल चार चार महिने घेतली जात नसेल तर असे ग्रुप करून मालवणच्या जनतेची दिशाभूल करण्याचं प्रशासनाने थांबवावे असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

गोपनीय अहवालात नमूद करण्यासाठी दिखाऊपणा

मुख्य अधिकारी हे आपल्या बढतीसाठी आपल्या गोपनीय अहवालात नमूद करण्यासाठी अश्या प्रकारचे इव्हेंट, फोटोग्राफी, आणि कॉम्पुटरवर आकडेवारीचा खेळ करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. याबाबत मुख्य अधिकारी यांनी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर करण्यापूर्वी ज्याप्रमाणे पूर्वी त्या त्या कालावधीतील नगराध्यक्ष यांची स्वाक्षरी घेतली जात होती, तशी स्वाक्षरी घेणे बाबत आमच्या नगराध्यक्ष संघटने मार्फत शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे. मुख्य अधिकारी आणि प्रशासक हे पद एकच व्यक्ती उपभोगत असल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली आहे. पण यामुळे त्याचा विपरीत परिणाम मालवणच्या विकासावर होत आहे. मी माजी लोकप्रतिनिधी असलो तरी पुढील निवडणूका होईपर्यंत याबाबत आवाज उठवणे ही आमची नैतिकता आहे, असे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!