मालवणात अनधिकृत चिरे, खडी वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई
आचरा आणि बेळणे येथे महसूलची कारवाई
मालवण : मालवण महसूल प्रशासनाने शुक्रवारी आचरा व बेळणे येथे अनधिकृत चिरा व खडी वाहतूक करणारे डंपर पकडले. याप्रकरणी संबधित डंपरमालकांना महसूल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.
आचरा तिठा येथे महसूल प्रशासनाने सकाळी ७.३० वाजता डंपरचालक संतोष जानू खरात याच्या ताब्यातील डंपर (एम. एच. ०७ सी. ५४१९) पकडला. सदरच्या डंपरमध्ये दोन ब्रास जांभा दगड सापडला. मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी एस. एन. जाधव, योगेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर बेळणे येथे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास डंपर चालक किसन शंकर जाधव याच्या ताब्यातील डंपर (एम. एच. ०७ ए. जे. २७०५) महसूल प्रशासनाने पकडला. डंपरमध्ये दोन ब्रास खडी सापडली. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने ही कारवाई करण्यात आली. दोन्ही डंपर तहसील कार्यालय मालवण येथे आणण्यात आले होते.