मालवणात भाजपच्या यशाचे श्रेय निलेश राणेंना ; ४० पेक्षा जास्त ग्रा. पं. वर भाजपा पुरस्कृत सरपंच विराजमान होणार
तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा दावा ; काही ग्रा. पं. मध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबतच्या नाराजीचा भाजपाला फटका
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात सातत्याने भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही निलेश राणेंचा करिष्मा दिसून आला आहे. या निवडणुकीत मालवण तालुक्यात भाजपचे ४० पेक्षा जास्त सरपंच निवडून आले आहेत. यातील काही उमेदवार गाव पॅनल मधून निवडून आले असले तरी त्यांना भाजपनेच पुरस्कृत केले आहे. त्यामुळे काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे. काही ग्रा. पं. मध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबतची नाराजी भाजपाला भोगावी लागली. मात्र झालेल्या चुकांची दुरुस्ती करून भविष्यातील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
ग्रा. पं. निकालानंतर श्री. चिंदरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, अशोक तोडणकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. यापूर्वी झालेल्या ६ ग्रा. पं. पैकी ५ ग्रा. पं. मध्ये भाजपचा विजय झाला. त्यानंतर सोसायटी निवडणुका, खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत निलेश राणे स्वतः लक्ष देत असून त्याचाच परिणाम म्हणून ५५ पैकी ४० पेक्षा जास्त ग्रा. पं. मध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत. काही गाव पॅनल मधून आमचे उमेदवार विजयी झाले आहेत. माजी खा. निलेश राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे मार्गदर्शन याच्या बळावर आम्हाला हा विजय मिळाला आहे. काही ग्रा. पं. मध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी आम्हाला भोवली. तर काही ठिकाणी बंडखोरी चा फटकाही बसल्याचे श्री. चिंदरकर म्हणाले.