किनारपट्टीवर भाजपचा सुपडा साफ ; हरी खोबरेकर यांची टीका
जि. प., पं. स. वर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज
मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. या निवडणुकीत किनारपट्टी भागात भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्या साठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
मालवण तालुक्यातील निवडणूक निकालानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव गटाला आणि आमदार वैभव नाईक यांच्यावरील मतदारांचा विश्वास अधोरेखित झाला आहे. कोळंब, रेवंडीसह प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथ ग्रा. पं. मध्ये आम्हाला यश मिळाले. सगळ्याच ग्रा. पं. मध्ये मतदार राजाने आम्हाला कौल दिला. हा कौल आम्हाला सुद्धा मान्य आहे. यापुढील काळात सुद्धा जास्तीत जास्त कामे करून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार विनायक राऊत यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडवण्यासाठी आणि शिवसेनेला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वायरी गावात अखेरच्या क्षणी काही घडामोडी घडल्या. पण मतदार राजाने शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन भगवान लुडबे यांच्यासह पाच सदस्य महाविकाअ आघाडीचे निवडून दिले आहेत. आगामी काळात वायरीसह ज्या ठिकाणी सेनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत, तेथे जास्तीत जास्त विकास कामे केली जातील, असे ते म्हणाले.