मालवणातील ४७ ग्रा. पं. चा उद्या फैसला ; उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली
तीन टप्प्यात होणार मतमोजणी ; हायहोल्टेज लढतींकडे सर्वांच्या नजरा
मालवण : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान घेण्यात आल्यानंतर उद्या सकाळी १० वाजता कुंभारमाठ मधील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यात ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. यात प्रथम तीन प्रभागांचा निकाल जाहीर होईल त्यानंतर सरपंच पदाचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. मतमोजणीसाठी २० पर्यवेक्षक, २० सहायक अन्य असे एकूण ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत तालुक्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. यंदाच्या ग्रा. पं. निवडणुकीत अनेक गावात हायहोल्टेज लढती पाहायला मिळाल्या. त्यामुळे काही ग्रा. पं. मध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४९ हजार १४५ मतदारांपैकी ३२ हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ६६. ७१ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान तिरवडे ग्रामपंचायतीसाठी ८२.३४ टक्के तर सर्वात कमी मतदान ओवळीये ग्रामपंचायतीसाठी ५९.३४ टक्के एवढे झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. भाजप, ठाकरे गट शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे उत्तर उद्या मिळणार आहे. तालुक्यातील वायरी भूतनाथ, कुंभारमाठ, देवबाग, तारकर्ली, कोळंब, वरची गुरामवाड, तळगाव, वायंगणी, तोंडवळी, हडी, कांदळगाव, सर्जेकोट-मिर्याबांदा, पोईप, वराड, चौके या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी, उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकद त्या त्या गावात लावल्याने यात त्यांना कितपत यश मिळते हे उद्या निकालाच्या दिवशी दिसून येणार आहे. उद्या सकाळी मतमोजणीस सुरवात होणार असल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांसह सदस्य पदाच्या उमेदवारांचीही धाकधूक वाढू लागली आहे.