भाजपाच्या मालवण तालुक्यातील बिनविरोध सरपंचांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे निलेश राणे यांनी केले कौतुक ; आमदार, खासदार नसतानाही मिळालेले यश उल्लेखनीय

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या मालवण तालुक्यातील भाजपच्या सरपंचांचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज येथील भाजपा कार्यालयात सत्कार करण्यात आला. मालवण तालुक्यात भाजपचा आमदार, खासदार नसतानाही येथील काही ग्रामपंचायतीवर भाजपची बिनविरोध सत्ता आणणे ही मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यात मालवणातच सर्वात जास्त बिनविरोध ग्रामपंचायती या भाजपच्या आल्या आहेत. यात सर्व भाजप कार्यकर्त्यांचे श्रेय आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या दिवशी मालवण तालुक्यात भाजपची सर्वात जास्त ग्रामपंचायतीवर सत्ता येईल, असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या सरपंचांचा आज मालवण भाजप कार्यालयात निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सुनील घाडीगांवकर, विजय केनवडेकर, संतोष गावकर, मोहन वराडकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, निशय पालेकर, राकेश सावंत, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सौ. रश्मी रवींद्र टेंबुलकर (आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ), सौ. स्नेहल बिरमोळे (घुमडे), महेश वरक (पळसंब), मनमोहन डिचोलकर (आंबेरी), सौ. विशाखा विजय काळसेकर (काळसे), सौ. चैताली चंद्रकांत गावकर (शिरवंडे) या सरपंच पदी बिनविरोध निवड झालेल्यांचा निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी निलेश राणे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत गावात भांडणतंटे न होता निवडणूका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपचा प्रयत्न होता. येथे भाजपचा आमदार खासदार नसतानाही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे काही ग्रामपंचायतीवर भाजपची बिनविरोध सत्ता आली आहे. मी फक्त नामधारी असून हे यश भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे. एकत्र होऊन लढल्याने यश मिळते हे आम्ही अलीकडे झालेल्या मालवण तालुका खरेदी विक्री संघ आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे भाजप ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविणार आहे, असेही निलेश राणे म्हणाले.

भाजपच्या बिनविरोध ग्रा. पं. ना विशेष निधी द्यावा ; सुनील घाडीगावकर यांची मागणी

सुनील घाडीगांवकर यांनी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून भाजपची सत्ता आणणे हे मोठे यश आहे, त्यामुळे भाजपचे याची विशेष दखल घ्यावी, भाजपची बिनविरोध सत्ता येणाऱ्या ग्रामपंचायतींना भाजप निधी देणार असे ऐकिवात असून त्यानुसार मालवण तालुक्यात भाजपची बिनविरोध सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीना शासकीय निधी व्यतिरिक्त भाजपकडून विकास कामांसाठी निधी मिळाला पाहिजे अशी मागणी केली. यावर निलेश राणे यांनी भाजपची बिनविरोध सत्ता आलेल्या मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतीना पक्षाकडून खास बाब म्हणून निधी मिळण्यासाठी आपण वरिष्ठांकडे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!