राज ठाकरे डिसेंबर मध्येच पुन्हा येणार मालवणात ; मनसेच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे नियोजन
पदाधिकाऱ्यांच्या संवादावेळी राज ठाकरेंनी केली सूचना ; स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांवरही जबाबदारी
राज ठाकरेंचे मालवणात जल्लोषी स्वागत ; जानकी मंगल कार्यालयात साधला संवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मालवणला भेट दिली. यावेळी कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. राज ठाकरे यांच्या समवेत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मालवण मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी डिसेंबर महिन्यात मालवणच्या बोर्डिंग मैदानावर मनसेच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. या स्पर्धेला स्वतः राज ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांवरही देण्यात येणार आहे.
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी उशिरा त्यांनी मालवणला भेट दिली. चौके मध्ये मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव आणि सहकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर मालवण कुंभारमाठ मधील जानकी हॉटेल मध्ये राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, जीजी उपरकर, अविनाश अभ्यंकर, गणेश कदम, गजानन राणे, संदीप राणे, तानाजी सावंत, सचिन गोळे तसेच तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, भारती वाघ, प्रतिक कुबल, गणेश वाईरकर आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.