ग्रा. पं. निवडणुकीत युतीबाबत निलेश राणेंसह भाजपा तालुकाध्यक्षांच्या संपर्कात !
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती ; वरिष्ठांच्या आदेशानुसारच युती बाबत बोलणी
मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सोबत युती करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश मान्य करीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी भाजपा सोबत युतीची चर्चा करीत आहेत. मालवण तालुक्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याशी युतीची बोलणी सुरु असून निवडणूक अर्ज भरून झाल्यानंतर पक्षीय बळानुसार जागा वाटप होईल, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर यांनी मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात आज जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन श्री. पारकर यांनी पक्षाची ग्रा. पं. निवडणुकी बाबत भूमिका मांडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, नीलम शिंदे, नेहा तोडणकर, निकीता तोडणकर, कविता मोंडकर, स्वप्नाली माळकर, गोपाळ शेलटकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, सागर घाडगे आदी व इतर उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने तयारी केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने एक पाऊल मागे येऊन उमेदवारीबाबत आम्ही तडजोडी करणार आहोत. या दृष्टीने मालवण तालुक्यातील गावागावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या भागातील दोन्ही पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार ठरविले जातील. आम्ही कुठेही कमी नसून प्रत्येक गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आहे. ग्रा. प. निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गावागावातील अस्तित्व दाखवून देऊ, असे सुनील पारकर म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात युती होत असल्याने त्या त्या गावातील स्थानिक पातळीवर तडजोडी करण्यात येतील. माजी माजी खासदार निलेश राणे व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे चर्चा करीत आहेत. प्रथम दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून त्यानंतर चर्चेतून दोन्ही पक्षाकडून कोणाची उमेदवारी कायम ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल. आमचा पक्ष प्रत्येक गावात आपली ताकद व अस्तित्व दाखविणार आहे. यात युतीला कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तसेच उमेदवारी बाबत जे नाराज होतील त्यांची मनधरणी करून पक्ष संघटनेला बाधा पोहचणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असेही पारकर म्हणाले.
शिवराज्य ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी किसन मांजरेकर
शिवराज्य ब्रिगेड या संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी या निवडी बाबतचे पत्र श्री. मांजरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी किसन मांजरेकर यांचे अभिनंदन केले.