राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात “राजपुत्र” ही होणार सहभागी
राज ठाकरे यांचा बहुचर्चित कोकण दौरा उद्यापासून ; उद्या संध्याकाळी होणार सिंधुदुर्गात आगमन
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा उद्या संध्याकाळ पासून सुरु होत आहे. या दौऱ्यात ते संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत. राज यांच्या या दौऱ्यात मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे राजपुत्राच्या दौऱ्यामुळे मनविसे च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ डिसेंबर पासून पासून कोकण दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरातून आंबोली मार्गे ते उद्या संध्याकाळी सिंधुदुर्गात येत असून सावंतवाडी गवळी तिठा येथे त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर मळगाव मार्गे हायवे येथील आराध्य हॉटेल कुडाळ येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थतीमध्ये अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार आहेत. १ डिसेंबरला सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा कार्यकर्त्यांची १० वाजता बैठक होईल. कुडाळ तालुका ११ वाजता भव्य स्वागत, त्यानंतर मराठा मंडळ येथे बैठक होणार आहे. मालवण येथे भव्य स्वागत होईल, त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मालवण तालुका कार्यकर्त्यांची बैठक मालवण येथे असणार आहे. २ डिसेंबर रोजी राज ठाकरे सकाळी आंगणेवाडी देवीचे दर्शन, तेथून कणकवली पटवर्धन चौक येथे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता मान्यवरांच्या गाठीभेटी, कणकवली विधानसभा कार्यकर्त्यांची दुपारी ३ वाजता बैठक, नागरिकांच्या गाठीभेटी व निवेदन स्वीकारणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात अमित ठाकरे देखील सहभागी होणार आहेत.