कणकवलीतील “खाऊ गल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ; बच्चे कंपनीच्या अक्षरक्ष: उड्या !
आ. नितेश राणेही रमले मुलांसमवेत : समीर नलावडे मित्रमंडळाच्या हटके उपक्रमाची चर्चा
कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने भरवण्यात आलेला “खाऊगल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ठरला. बच्चे कंपनीने या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हटके स्टाईलने या खाऊ गल्लीचे उदघाटन झाले. यावेळी आ. नितेश राणे हे देखील बच्चे कंपनी समवेत रंगल्याचे पाहायला मिळाले. समीर नलावडे मित्रमंडळाच्या ह्या हटके उपक्रमाची जोरदार चर्चा सुरु होती.
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे हे सातत्याने नवनवीन उपक्रमामुळे नेहमी चर्चेत असतात. मागील साडेचार वर्षात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. असाच एक कार्यक्रम म्हणजे खाऊगल्ली ! आमदार नितेश राणे यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. नेहमीप्रमाणे श्रीफळ वाढवून उद्घाटन करणे टाळत खाऊ गल्लीचा खजिना आमदार नितेश राणे यांनी चावी लावत उघडला आणि शेकडो मुले अक्षरश: या खजिन्यावर तुटून पडली. त्यानंतर या खजिन्यातील लपवलेल्या चॉकलेट मध्ये असलेल्या चार चांदीच्या कॉईनच्या चिठ्ठ्यांसाठी सर्वांचीच उत्कंठा शिगेला ताणली. या चॉकलेट मध्ये चांदीच्या कॉइन साठी चिठ्ठ्या लपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर यातून चार जण भाग्यवान विजेते निवडले गेले. या चारही भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते चांदीचे कॉइन देऊन गौरविण्यात आले. या अनोख्या हटके स्टाईलने केलेल्या उद्घाटनाची चर्चा मात्र या कार्यक्रमात सुरू होती. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने कणकवलीतील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला. कणकवली नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये छोट्यांना पन्नास रुपयांचे कुपन घेण्याकरिता रांगा लागल्या होत्या. तर नदीपात्रात करण्यात आलेल्या कारंज्याने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, अबीद नाईक, माजी नगरसेवक किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, बंडू गांगण, चारुदत्त साटम, मेघा सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, राज नलावडे, शिशिर परुळेकर, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, संजीवनी पवार, महेश सावंत, प्राची कर्पे, संजना सदडेकर, राजू गवाणकर, आदि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी गर्दी केली होती.