आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील “या” महत्वाकांक्षी योजेनेला शिंदे – फडणवीस सरकारकडून ब्रेक ?

ब्रि. सुधीर सावंत यांचे मालवणात संकेत ; राज्य सरकार पर्यटन विकासाची श्वेतपत्रिका काढणार

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णयांचा फेरविचार सुरु केला आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्गातील एका महत्वाकांक्षी योजनेला युती सरकार कडून ब्रेक मिळण्याचे संकेत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी मालवणात पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. आदित्य ठाकरे यांनी येथील पर्यटन विकासासाठी किनाऱ्यावर बीच शॅक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र गोव्यात बीच शॅकमुळे किनारे खराब झाले असून सिंधुदुर्गातील किनारे आम्ही खराब करणार नाही. महाविकास आघाडी ने जाहीर केलेल्या बीच शॅक योजनेचा पुनर्विचार केला जाईल, असे ब्रि. सावंत यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज मालवण येथील पक्ष कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संजय आग्रे, बबन शिंदे, महेश राणे, विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, पराग खोत, आशिष नाबर, नीलम शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ब्रि. सुधीर सावंत यांनी पर्यटन विकासाच्या धिम्या गतीबाबत नाराजी व्यक्त होती. मुख्यमंत्र्यांच्या नजरेतील महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. मालवण शहरात पर्यटन हा प्रमुख उद्योग आहे. त्यातून स्थानिक तरुणांना चांगला रोजगार मिळू शकतो. पण अलीकडे शहराची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी मालवण शहराच्या पर्यटन विकासासाठी मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. भुयारी गटार योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे. शहरात स्वच्छता गृह नाहीत. मग येथील पर्यटन कसे वाढणार ? परदेशात प्रत्येक गाव पर्यटन दृष्ट्या विकसित केला जातो. गावागावात पर्यटन विकास केंद्रे सुरु केली जातात. पण मालवणात अद्याप एकही पर्यटन विकास केंद्र सुरु झालेले नाही. माधवराव सिंधीया यांनी 1992 मध्ये पर्यटन विकासाची संकल्पना आणली. पण 30 वर्षे आपण पर्यटन विकासासाठी कोणते प्रयत्न केले ? न्याहारी निवास योजना चांगली योजना आहे. गावागावात त्याचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. केवळ फाइव्ह स्टार हॉटेल आणून गावातील माणूस श्रीमंत होणार नाही. त्यासाठी निवास न्याहारी, कृषी पर्यटन सारखे प्रकल्प प्रत्येक गावात उभे राहिले पाहिजेत. मालवणी जेवणाला जागतिक महत्व आहे. ह्या सर्वांकडे शिंदे सरकार प्राधान्याने लक्ष देणार आहे. धामापूर येथे पर्यटन केंद्र सुरु करण्यात आले आहे. मात्र त्याची आज दुर्दशा झाली आहे. मागील सरकारने बीच शॅक योजना आणली. गोव्यात अशा बीच शॅकने किनाऱ्याची वाट लावली. राज्यशासन या बाबत पुनर्विचार करणार आहे. येथील पर्यटनावर श्वेतपत्रिका काढली जाणार आहे, किनाऱ्यावर मध्यधुंद पर्यटक नको. त्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायतसह स्थानिक जनतेने देखील लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!