नेरूर आणि एमआआयडीसी क्षेत्रातील बायो मेडिकल प्रकल्प अनधिकृत ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांची माहिती ; प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या बायो मेडिकल प्रकल्पामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याठिकाणी हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. या अनधिकृत असलेल्या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांवर गेल्यावर त्या ठिकाणी प्रकल्पाचे एकही अधिकारी उपलब्ध झाले नाही. मात्र प्रकल्पावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर असलेली दुर्गंधी उपस्थितांना सहन करावी लागली.

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे गेले अनेक वर्ष बायो मेडिकल हा प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी रुग्णालयांमध्ये असलेला टाकावू कचरा यावर प्रक्रिया तसेच हा कचरा नामशेष करण्याचा प्रकल्प थाटण्यात आलेला आहे. मात्र याला कोणत्याही प्रकारे शासनाची परवानगी नाही. त्याचप्रमाणे नेरूर एमआयडीसी येथे सुद्धा हा प्रकल्प करण्यात आला आहे. हे दोन्ही प्रकल्प नेरूर गावाच्या हद्दीत आहे दरम्यान, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे याबाबत संबंधित कंपनीशी चर्चा केल्यानंतर हे प्रकल्प अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र कोणीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही. अनधिकृतपणे या ठिकाणी रुग्णालयांमधील कचरा टाकून हवेत प्रदूषण करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी दिलेली जमीन सुद्धा नापीक होणार आहे त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले

नेरूर येथे प्रकल्प असलेल्या जमिनीचे मालक प्रदीप नाईक यांनी सांगितले की, हा प्रकल्प बंद करण्यासंदर्भात संबंधित कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे असे असताना सुद्धा त्यांनी हा प्रकल्प सुरू ठेवलेला आहे यापुढे ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी केली जाणारा आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाकाऊ कचरा येत होता. आता मात्र इतर जिल्ह्यातीलही टाकाऊ कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा अशी आम्ही मागणी केली आहे असे सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे रूपेश कानडे, सचिन तेंडुलकर, रुपेश बिडये, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश परब, राजीव कुडाळकर, अशोक कंदुरकर, अभय सामंत आदी उपस्थित होते.

… मग नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाला विरोध का ?

एमआयडीसी क्षेत्रामध्ये हा बायोमेडिकल प्रकल्प ज्या ठिकाणी सुरू होणार आहे, त्या प्रकल्पाच्या बाजूला नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प होणार होता. मात्र या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच नेरूर ग्रामस्थांनी विरोध केला. आता घनकचऱ्यापेक्षा प्रदूषण निर्माण करणारा रुग्णालयातील टाकाऊ कचरा प्रकल्प उभा राहिला तरी नेरुर येथील कोणीही विरोध केलेला नाही, यामागे नेमकं कारण काय ? याला कोणाचा वरदहस्त आहे हे उघड होणे गरजेचे आहे, असे संध्या तेरसे म्हणाल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!