मुंबईतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह कणकवलीच्या लॉजिंग मध्ये.!
कणकवली : मुंबईहून बेपत्ता झालेल्या एका होलसेल दुकानातील सेल्समनचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बाथरूम मध्ये आढळून आला. मात्र या लॉजिंग कर्मचाऱ्या कडून याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मुंबईपासून ते कणकवली पर्यंत पोलीस व अन्य सामाजिक कार्यकर्ते देखील या बेपत्ता झालेल्या सेल्समन राजेंद्र प्रभाकर सावंत यांच्या शोधात रात्रीपर्यंत राहिले. टॉवर लोकेशन द्वारे देखील राजेंद्र सावंत (50) यांचा कणकवली पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कामाकरिता स्वतः पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर फिल्डवर उतरले. अखेरीस राजेंद्र सावंत यांच्या नातेवाईकांनी लॉजिंग मधील रजिस्टर मध्ये पुन्हा शोध मोहीम राबवली. आणि त्यात कणकवलीतील शुभम लॉजिंग मध्ये राजेंद्र सावंत आले होते हे स्पष्ट झाले. व त्यानंतर पुढील शोध सोपा झाला. लॉजिंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पोलिसां सह सर्वांनाच मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ राजापूर तालुक्यातील असलेले सध्या मुंबई अंधेरी येथे राहत असलेले राजेंद्र प्रभाकर सावंत हे काल मुंबईहून बेपत्ता झाले ते आज सकाळी कणकवलीत तुतारी एक्सप्रेस ने कणकवली रेल्वे स्टेशनला उतरले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र शोध लागत नसल्याने पोलिसात धाव घेतली. मुंबईमध्ये त्यांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन कणकवली मध्ये आढळले. मुंबई पोलिसांनी त्यांचे कणकवली मधील लोकेशन सांगितल्यामुळे त्यांचे राजापूर मधील काही कुटुंबीय सायंकाळी कणकवलीमध्ये दाखल झाले. राजेंद्र सावंत हे मुंबईमध्ये एका मोठ्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून कार्यरत होते. कणकवलीतील काही नामांकित दुकानांमधील ते ऑर्डर घेऊन त्या मुंबईतील दुकानाद्वारे घेतलेली ऑर्डर पाठवत असत. ही ऑर्डर घेण्यासाठी त्यांचे कणकवलीत काही दुकानदारांकडे येणे जाणे असायचे. त्यामुळे कणकवलीतील काही नामांकित दुकानदारांची ही त्यांची चांगली ओळख होती. राजेंद्र सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सायंकाळी कणकवली पोलिसांना दिली व त्यांच्या लोकेशन संदर्भात देखील माहिती दिली. त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी याबाबत खातरजमा करत आचरा रोडवर त्यांच्या दाखवत असलेल्या टॉवर लोकेशन द्वारे सना कॉम्प्लेक्स पासून ते आशिये रोड पर्यंत सर्वत्र शोधाशोध केली. या ठिकाणच्या बिल्डिंगमध्येही शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक सरदार पाटील, व्ही एम चव्हाण, मंगेश बावदने, उत्तम वंजारे, रवींद्र बाईत यांच्यासह शिवसेन उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, निखिल आचरेकर, गणेश तळगावकर आदींनी देखील मोहिमेत पोलिसांना सहकार्य केले. कणकवली या टॉवर लोकेशन च्या आसपास अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवून देखील राजेंद्र सावंत यांचा शोध लागत नसल्याने पोलीस देखील हैराण झाले होते. तत्पूर्वी सायंकाळच्या सुमारास कणकवलीतील काही लॉजिंग मध्ये देखील पोलीस व राजेंद्र सावंत यांच्या कुटुंबियांनी जाऊन राजेंद्र सावंत येथे आले होते का? असे त्यांचा फोटो दाखवत चौकशी केली होती. तसेच कणकवलीतील ज्या मोठ्या जनरल स्टोअर मध्ये राजेंद्र सावंत ऑर्डर घेण्यासाठी जात असत त्या दुकानदारांकडे देखील ते आज आले होते का? याबाबत चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून देखील नकार आला. ज्या शुभम लॉजिंग मध्ये त्यांचा मृतदेह सापडला तिथे लॉजिंग वर असलेल्या कर्मचाऱ्यांने ही व्यक्ती आली नसल्याचे पहिल्यांदा सायंकाळी सांगितले अशी माहिती श्री सावंतस यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर सायंकाळी सर्वत्र शोधून घेऊन देखील हाती काहीच लागत नसल्याने राजेंद्र सावंत यांच्या कुटुंबीयांनी कणकवलीतील काही लॉजिंग वर पुन्हा स्वतः रजिस्टर चेक करण्याची मोहीम हाती घेतली. व यात शुभम लॉजिंग मध्ये राजेंद्र सावंत यांच्या नावाची नोंद सकाळच्या सुमारास केल्याचे आढळले. याच दरम्यान त्या लॉजिंग प्रशासनामध्ये देखील तेथील कॉमन बाथरूमचा दरवाजा बराचवेळ बंद असल्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र तो दरवाजा बंद कसा? याबाबत कोणीही गांभीर्याने घेतले नव्हते. ज्यावेळी राजेंद्र सावंत हे शुभम लॉजिंग मध्ये आले होते. ही खात्री झाल्यानंतर त्यांनी घेतलेली रूम नंबर चेक करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय गेले असता त्या रूम ला कुलूप लावलेले आढळले. यावेळी त्यांनी सदर बाब पोलिसांना कळवली. व पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अगोदर कॉमन असलेल्या बाथरूमचा दरवाजा तोडून राजेंद्र सावंत यांचा मृतदेह बाहेर काढला. तसेच त्या रूम मधील देखील कुलूप उघडून खात्री केली असता राजेंद्र सावंत यांची बॅग,कपडे, पैशांचे पाकीट, आधार कार्ड व अन्य वस्तू तेथे आढळल्या. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आला असून, अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. मात्र हा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अध्यक्ष स्पष्ट झालेले नाही. लॉजिंग च्या कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा झाल्याने अगदी मुंबई पासून ते कणकवली पर्यंत पोलीस यंत्रणा मात्र कामाला लागली. व राजेंद्र सावंत यांच्या कुटुंबीयांना देखील मनस्ताप सहन करावा लागला.