सत्ता असताना फसव्या घोषणा ; सत्ता गेल्यावर अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे चेपण्याचा प्रकार !

आ. वैभव नाईकांवर मनसेची टीका ; कुंभारमाठ ग्रामस्थांच्या भीतीपोटीच आ. नाईक सा. बां. कार्यालयात

मालवण | कुणाल मांजरेकर

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कामे महिनोन् महिने रेंगाळत ठेवतात, असा बेजबाबदारपणाचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सत्तेच्या गुर्मीत असताना नवीन रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला, खड्डे बुजवण्यासाठी निधी आणला, अशा फसव्या घोषणा केल्या आणि आता सत्ता गेल्यानंतर साडेतीन महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे चेपण्याचा प्रकार आमदारांकडून होत आहे, अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटलं आहे की, मनसेने खड्ड्यांप्रश्नी सातत्याने आवाज उचलला. त्यावेळी नाईकांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का ? सत्ता गेल्यानंतर कामे दर्जेदार करा, तातडीने करा असे आमदार म्हणत असतील तर या अगोदर आमदार नुसत्या घोषणा करत होते, घोषणा पलीकडे काय झाले ? तेव्हा त्यांना अपेक्षित दर्जेदार कामे होत होती का ? आज जी कामे होत नाहीत, ती कामे यापूर्वी होत होती काय ? आमदारांच्या काळात झालेली सर्व कामे निकृष्ट तसेच. ती दर्जेदार होण्यासाठी काय प्रयत्न केले ? आताच प्रचिती कशी आली ? मातोश्री पाणीधन योजनेचे पुढे काय झाले, ते आमदार वैभव नाईकांनी सांगावे, असे सांगून स्वतःच्या अपयशाचे खापर अधिकारी वर्गावर फोडण्याचे काम आमदार करत आहेत. ज्या कार्यालयात अधिकाऱ्यांवर आरोप केला त्या मालवण सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शाखा अभियंता ३ पदे, क्लार्क २ पदे, ड्रायव्हर १ पद, रस्त्यांची कामे सुरु असताना दर्जेदार होण्यासाठी लागणारा मुकादम वर्ग सर्व ५ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आमदारांनी सत्तेत असताना काय प्रयत्न केले ? ते सांगावे.

काळसे, बेळणे, सागरी महामार्ग, कसाल-मालवण रस्ता या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. याला लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार जबाबदार आहेत. कुंभारमाठ येथील रहिवाशांनी जरीमरी मंदिराच्या बाजूस असलेल्या कसाल मालवण रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी बांधकाम विभागाला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याने भीतीपोटी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयास भेट देण्याची नौटंकी केली असल्याचेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!