महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठीच “आनंद शिधा” चे गाजर ; शिवसेनेचा टोला
१०० रुपयात चार जिन्नस देण्याचे जाहीर असताना प्रत्यक्षात दोन ते तीन वस्तूच उपलब्ध
८० % कार्ड धारकांना आनंद शिधा नाहीच ; शिधा वाटपात घोटाळा : हरी खोबरेकर यांचा आरोप
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून रेशन दुकानां वरून दिवाळीच्या तोंडावर आनंद शिधा देण्याचे जाहीर केले. या शिध्यात १०० रुपयात चार जिन्नस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ८० % कार्ड धारकांना आनंद शिधा अद्यापही मिळालेला नाही. ज्या २० % लोकांना मिळाला, त्यातील अनेकांना चार ऐवजी दोन ते तीन जिन्नसच दिले जात आहेत. वाढत्या महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठी हे गाजर दाखवण्यात आले. मात्र यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आज राज्यातील अनेक प्रकल्प देशाबाहेर जात आहेत. वाढत्या महागाईने लोक बेजार झाले आहेत. या विरोधात येत्या काळात शिवसेना आक्रमक पणे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
येथील शिवसेना शाखेत श्री. खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, महेश जावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, राज्य सरकारची आनंद शिधा योजना जनतेची थट्टा करणारी ठरली आहे. या वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. जनतेला जो शिधा दिला, तो निकृष्ट असून प्रशासनाचा या वाटपावर अंकुश नाही. काही ठिकाणी भाजपाकडून बॅनर बाजी करून शासकीय योजना असताना स्वतःला श्रेय घेण्याचा प्रकार सुरु असल्याचे ते म्हणाले. सरकारला गरीबांना मदत दयायचीच होती तर निकृष्ट धान्य देण्यापेक्षा रेशनकार्ड धारकांच्या खात्यावर रक्कम दिली असती तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झाला असता, असेही ते म्हणाले.
स्वतःला पुरणपोळी खायची असेल तर पातेलेभर तूप आणि…
स्वतःला पुरणपोळी खायची असेल तर पातेलेभर तूप आणि सर्वसामान्य जनतेला पामतेलचे वाटप ही महाराष्ट्रात शोकांतिका असल्याची टीका हरी खोबरकर यांनी केली. पामतेल हे आरोग्यास हानिकारक असल्याचे डॉक्टर सांगत असतानाही जनतेला सणासुदाला पामतेलाचे वाटप केले जात आहे. तसेच या शिध्यासाठी नागरिकांना वारंवार रेशन दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागल्या, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आज महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. २०१४ रोजी गॅस सिलेंडरचे दर ४१० रुपये होते, ते आता १०५३ पर्यंत पोहोचले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दरही गगनाला भिडले असून वाढत्या महागाई वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी एका महिन्याला आनंद शिधा दिला जात आहे, असे हरी खोबरेकर म्हणाले.