“मालवण” सेल्फी पॉईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण

सेल्फी पॉईटमुळे शहराच्या पर्यटन विकासात भर : आ. नाईक

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि सहकाऱ्यांच्या शहर विकासाच्या प्रयत्नांचे कौतुक

“त्या” सन्मानाने येवल्याचे पर्यटकही भारावले ; आ. नाईकांसह महेश कांदळगावकर यांचे केले कौतुक !

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर सुशोभीकरणासाठी आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने जिल्हा पर्यटन निधीतून ८ लाख रुपये खर्चून रॉक गार्डन मध्ये तयार करण्यात आलेल्या “मालवण” सेल्फी पॉईंटचे लोकार्पण सोमवारी आ. नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सेल्फी पॉईंट मुळे शहराच्या पर्यटन विकासात भर पडेल, असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.

मालवण शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करत असताना शहर सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने मालवण शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण साठी निधी मिळावा, अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. नाईक यांनी पाठपुरावा करून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. समुद्राच्या काठावर असलेले मालवण पालिकेचे रॉक गार्डन हे पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे. डेकोरेटिव्ही लाईट, म्युझिकल फाऊटन यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात, फोटोग्राफीचा आनंद घेतात. या पर्यटकाना मालवण कायम स्मरणात रहावे, या उद्देशाने या ठिकाणी “आय लव्ह मालवण” हा सेल्फी पॉईंट होण्याच्या दृष्टीने सन २०२०- २१ मध्ये ८ लाख रुपये जिल्हा पर्यटन निधीची मागणी करण्यात आली होती. आणि यास ३१ मार्च २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. यासाठी आमदार वैभव नाईक यांनीही पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या नुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन हे काम पूर्णत्वास आलेले आहे. त्याचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

येवल्याच्या पर्यटकांचा सन्मान !

येवले येथील दोन ज्येष्ठ पर्यटक दांम्पत्य रॉक गार्डन मध्ये आले असता माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आ. वैभव नाईक यांच्याशी त्यांची भेट घडवून दिली. यावेळी आ. नाईक यांनी त्यांचे शहरात स्वागत केले. तसेच सेल्फी पॉईंटच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी करून घेतले. या आदरतिथ्याने हे पर्यटक देखील भारावून गेले. हे स्वागत आणि मालवण आमच्या नेहमीच लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत आ. वैभव नाईक आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे कौतुक केले.

यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, नरेश हुले, आशिष परब, प्रसाद आडवलकर, दादा पाटकर, पूनम चव्हाण, अनंत पाटकर, किशोर गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!