शिवसेनेच्या मोर्चाला भाजपा संविधान समर्थन रॅलीने प्रत्युत्तर देणार !
२१ ऑक्टोबरला कुडाळ मध्ये निघणार रॅली : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निलेश राणेंसह दिग्गजांची उपस्थिती
भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांना लाचलूचपत खात्याकडून मिळालेल्या चौकशीच्या नोटीसी विरोधात शिवसेनेच्या वतीने उद्या कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला भाजपा कडून संविधान रॅलीने प्रत्युत्तर दिले जाणार आहे. २१ ऑक्टोबरला कुडाळ मध्ये निघणाऱ्या या रॅलीमध्ये मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणेंसह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दादा साईल म्हणाले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भारतीय संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याच भारतीय संविधानाने विविध शासकीय आणि प्रशासकीय संस्थांना अधिकार प्रदान केले आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB) याच संविधानिक अधिकारांचा वापर करून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्याचा राग मनात ठेवून आमदार महोदय आणि त्यांचे चेले हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढत असलेला मोर्चा निषेधार्य आहे. हा मोर्चा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचा (भारताची राज्यघटना) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. आणि हा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही. यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने व माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देशाला महासत्तेकडे नेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ ‘आमचे संविधान आमचे अभिमान’ संविधान समर्थन रॅली काढणार आहे.
ही रॅली शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भाजपा कार्यालय कुडाळ येथून सुरू होईल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे या रॅलीची सांगता होईल. या संविधान रॅली मध्ये मुंबई बँकेचे अध्यक्ष, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपाचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, असे दादा साईल यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, सचिन तेंडुलकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, सोशल मीडिया युवा मोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, नगरसेवक निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील, राजा प्रभू, सतीश माडये, चिटणीस रेवती राणे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.