… तर शिवसेनेच्या मोर्चावेळी आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील ; भाजपाचा इशारा !
कुडाळच्या तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन सादर
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने उद्या १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात आक्षेपार्ह, चिथावणीखोर तसेच भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक व कुडाळ तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
आ. वैभव नाईक यांना एसीबी ची नोटीस आल्या प्रकरणी उद्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुडाळ मध्ये मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे (शिवसेना) समर्थनार्थ मोर्चात कोणत्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यावर आक्षेपार्ह चिथावणीखोर तसेच भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास तसे प्रतिक्रिया म्हणून भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल आणि यातून कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी भारतीय जनता पार्टी अथवा कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत. तर सर्वस्वी शासकीय यंत्रणा, आमदार व त्यांचे मोर्चातील समर्थक, पदाधिकारी जबाबदार असतील यांची नोंद घ्यावी. याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे व कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, सचिन तेंडुलकर, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, सोशल मीडिया युवा मोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, राजेश पडते, मंगेश चव्हाण महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील, राजा प्रभू, सतीश माडये, चिटणीस रेवती राणे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.