मालवणात नगरपालिकेच्या वाहनतळाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

उद्यापासून वाहनतळ पर्यटकांसाठी खुले ; वाहनतळा नजिकच्या शौचालयाचे कामही लवकरच पूर्ण होईल

जिल्ह्यातील पहिलेच सुसज्ज लवकरात मालवणात सुरु ; आ. वैभव नाईक यांची माहिती : भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मानले विशेष आभार

मालवण : कुणाल मांजरेकर

शहरातील भरड नाका परिसरात आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून साकारण्यात आलेल्या नगरपालिकेच्या वाहनतळाचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. आगामी दिवाळी सण आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे वाहनतळ लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मागील आठवड्यात मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार आ. वैभव नाईक यांच्या हस्ते हे पार्किंग खुले झाल्याने परिसरातील व्यापारी वर्गाने आभार मानले आहेत.

मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असताना वाहनतळा अभावी शहरात वाहतूक कोंडी तसेच पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंग चा प्रश्न सातत्याने निर्माण होत होता. त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून वाहन तळासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी पालिकेला वर्ग करण्यात आला. यातून सदरील काम हाती घेण्यात आले आहे. या लोकार्पण प्रसंगी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, नरेश हुले, आशिष परब, प्रसाद आडवलकर, दादा पाटकर, पूनम चव्हाण, अनंत पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्नानगृह आणि शौचालय लवकरच सुरु : आ. वैभव नाईक

वाहन तळ उभारताना येथे येणाऱ्या पर्यटकांना सुसज्ज शौचालय आणि स्नानगृह उपलब्ध असावे या हेतूने ६ लाख रुपये मंजूर केले असून याचे कामही या ठिकाणी सुरु आहे, लवकरच हे काम पूर्ण होईल. आज जिल्ह्यातील पहिल्या वाहन तळाचे लोकार्पण मालवणात करण्यात आले आहे, अशी माहिती आ. नाईक यांनी दिली.

भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मानले आभार

भरड परिसरातील वाहनतळ दिवाळी पूर्वी सुरु करण्याची मागणी भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. यामागणी ची दखल घेऊन वाहनतळ सुरु करण्यात आल्याने व्यापारी आणि नागरिकांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!