महेश जावकर “इम्पॅक्ट” ; चिवला बीच स्मशानभूमी “प्रकाशमान”
जावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाचे मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी मधील गैरसोयींकडे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पालिका प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या दोन दिवसात प्रशासनाने याची दखल घेतली आहे. याठिकाणच्या बंद स्ट्रीट लाईट आणि दिवे सुरु करण्यात आले असून यांमुळे चिवला बीच स्मशानभूमीचा परिसर प्रकाशमान झाला आहे. याबाबत महेश जावकर यांनी पालिका प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
चिवला बीच स्मशानभूमी मधील गैरसोयीं बाबत महेश जावकर यांनी ६५ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मंगळवारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिले होते. यामध्ये स्मशानभूमी मधील लाईट बंद असल्याने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधले होते. याची तातडीने दखल घेत गुरुवारी येथील लाईट दुरुस्त करण्यात आल्या आहेत. याबाबत महेश जावकर यांनी प्रशासनाचे आभार मानले असून स्मशानभूमी मधील उर्वरित समस्या देखील दूर करण्या बाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.