अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबवा ; अन्यथा मनसेचे नेरूरपार पुलावर आंदोलन
तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा महसूल प्रशासनाला इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावर दररोज अवैध वाळू वाहतूक करणारे 100 हून अधिक डंपर बिनदिक्कतपणे धावत आहेत. मात्र महसूल प्रशासनाचा त्यावर अंकुश नाही. भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपर मुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. तरी महसूल प्रशासनाने अनधिकृत डंपरची अवैध वाहतूक रोखावी, अन्यथा मनसेच्या वतीने नेरूरपार पुलावर या अनधिकृत वाळू वाहतुकी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी दिला आहे.
तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहेच. शिवाय यामुळे जिल्ह्याचा वैध मार्गाने येणारा महसूलही बुडत आहे. ही वाळू वाहतूक करणारे परराज्यातील पासिंगचे डंपर नागरीक व इतर रहदारीसाठी एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे मालवण ते कुडाळ मार्गावरील सामान्य नागरीक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत. अलीकडेच या भरधाव डंपरमुळे सागरी महामार्गावर एका पाळीव जनावराचाही अंत झाला.
तालुक्यातील हडी, कालावल, बांदिवडे,आंबेरी येथून हे अवैध वाळू उत्खनन होते. त्यानंतर संध्याकाळनंतर संपूर्ण रात्रभर हीच वाळू वाहतूक करणारे डंपर एकामागोमाग एक सुसाट वेगाने सुटतात. याबाबत मनसेने नुकत्याच झालेल्या एस.टी. व डंपर अपघाताबाबत वाचा फोडली. या सर्व गोष्टी तहसीलदार व इतर प्रशासनाच्या देखत घडत असल्याचा आरोप मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी केला आहे. यासंबंधी वारंवार इशारे देऊनही हे अवैध प्रकार थांबत नसल्याने आता मनसे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मनसे थेट नेरुरपार पुलावर अशा वाहनांबद्दल आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.