जालन्याचा २२ वर्षीय पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाला !

पर्यटक मद्यधुंद अवस्थेत ? किनाऱ्यावर दारूच्या बाटल्या ; स्थानिकांची नाराजी

मालवण | कुणाल मांजरेकर

यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होत असतानाच तारकर्ली समुद्रात जालना (औरंगाबाद) येथील २२ वर्षीय पर्यटक बुडून मयत झाल्याची दुर्घटना घडली आहे. सचिन शिवाजी जाधव (रा. भोकरदन, जालना) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

चालकासह सहा पर्यटकांचा ग्रुप औरंगाबाद येथून पर्यटनासाठी आला होता. हे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी करून याबाबत नाराजी व्यक्त केली. हे पर्यटक बसलेल्या ठिकाणी बिअर आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सहा पर्यटकांचा एक ग्रुप खासगी गाडीने आज दुपारी १ वाजता तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. यामध्ये सचिन एकनाथ जाधव यांच्यासह सचिन शिवाजी देठे, योगेश पुंडलिक दळवी, योगेश आत्माराम खिल्लारे, विनोद काकासाहेब खिल्लारे, विठ्ठल विष्णू दळवी यांच्यासह चालक रमेश एकनाथ काटकर यांचा समावेश होता. दुपारी जेवणानंतर हे युवक आंघोळीसाठी समुद्रात उतरले असता यातील सचिन जाधव याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही माहिती समजताच वैभव सावंत, दशरथ चव्हाण या स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर आणला.

दुर्घटनेनंतर पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, हेड कॉ. राजन पाटील, कैलास ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील भानुदास येरागी, तलाठी वसंत राठोड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. हे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी करून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी घटनास्थळी दारू आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!