आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी व टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास

किल्ले होडी वाहतूक संघटना, पर्यटक आणि नागरिकांमधून समाधान

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील बंदर जेटी आणि टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. याबाबत किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक, व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आ. नाईक यांच्याकडे किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक व स्थानिक नागरिकांनी मालवण बंदर येथील जीर्ण जेट्टीच्या ठिकाणी नव्याने अद्ययावत जेट्टी व टर्मिनल इमारतीची मागणी केली होती. या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन सदर कामास सागरमाला योजनेअंतर्गत २६ ऑक्टोबर २०१७ रोजी १०.२३ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला. सदर कामाबाबत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ३ मे २०१८ रोजी जेटीच्या कामाचा मे. एस एल ठाकूर या ठेकेदारास व ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी टर्मिनल इमारतीच्या कामाचा मे. विनोद कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला. तदनंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये ही दोन्ही कामे पूर्ण करण्यात आली. सदर ठिकाणी पाईल जेट्टी, टर्मिनल इमारत, वाहनतळ, व धुपप्रतिबंधक बंधारा तसेच या टर्मिनल इमारतीमध्ये तिकीट घर, प्रतीक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, त्याचप्रमाणे तीन वाहनतळांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कामाची २८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती व पुढील काहीच दिवसात या कामाचा लोकार्पण सोहळा करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या होत्या.

या पूर्ण करण्यात आलेल्या मालवण बंदर जेट्टी व टर्मिनल इमारतीच्या कामाबाबत स्थानिक नागरिक, किल्ले वाहतूक होडी संघटना तसेच पर्यटकांमधून देखील दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त केले जात असून आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले जात आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3845

Leave a Reply

error: Content is protected !!