माजी खासदारांचे “ते” आश्वासन म्हणजे फसवणूक नाही का ?

आ. वैभव नाईकांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंवर मंदार केणींचा प्रतिहल्ला

अर्धवट माहितीच्या आधारे आमदारांवर आरोप ; व्यायामशाळेतील साहित्याचे बील ठेकेदाराला अद्याप अदाच केलेले नाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य गायब झाल्याने आमदार वैभव नाईक यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेते निलेश राणेंवर माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी प्रतिहल्ला केला आहे. आमदारांवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या माजी खासदारांनी तोंडवळी येथील बंधाऱ्यासाठी १० कोटीचे आश्वासन दिले, त्याचा अद्याप पत्ताच नाही ही लोकांची फसवणूक नाही का? देवबाग बंधाऱ्याचे उदघाटन झाल्यावर त्याचे काम आता सत्ता आल्यावर का सुरू झाले नाही ? याचे उत्तरही भाजपच्या नेत्यांनी द्यावे असेही श्री. केणी यांनी म्हटले आहे.

पालिकेच्या व्यायाम शाळेसाठी ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या साहित्यात त्रुटी असल्याचे लोकार्पणाच्या दिवशीच निदर्शनास आले. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी संबंधित ठेकेदाराला साहित्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश देत जोपर्यंत या त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा न करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यामुळे माजी खासदार निलेश राणेंनी अर्धवट माहिती घेत केलेल्या आरोपात तथ्य नाही असेही मंदार केणी यांनी स्पष्ट केले आहे.

येथील पालिकेच्या व्यायाम शाळेतील व्यायामपटूंसाठी उपलब्ध करून दिलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून ते गायब झाले आहे. आमदारांनी शहरवासीयांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असा आरोप माजी खासदार निलेश राणेंनी केला होता. यावर श्री. केणी यांनी राणेंवर जोरदार टीका केली. यावेळी युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, येथील पालिकेच्या व्यायाम शाळेसाठी नवीन साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी व्यायामपंटुनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नाईक यांनी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. साहित्याचे लोकार्पण करताना ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या साहित्यामध्ये त्रुटी असल्याचे व्यायामपटूंनी सांगितले. त्यानुसार आमदारांनी त्याचवेळी संबंधित ठेकेदाराला साहित्यातील त्रुटी दूर करण्याची आणि व्यायामपटूंची खात्री झाल्यावरच ठेकेदाराला बिल अदा करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. त्यानुसार सर्व मशनरीतील त्रुटी दूर करून व्यायामपटूंची खात्री झाल्यावरच त्या मशनरी व्यायामशाळेत बसविल्या जातील असे ठेकेदाराने स्पष्ट केले. त्यामुळे अद्याप पर्यंत संबंधित ठेकेदाराला एक रुपयाचे बिलही देण्यात आलेली नाही. त्यामुळे निलेश राणेंनी केलेला आरोप हा अर्धवट माहिती घेत केला आहे. व्यायाम शाळेतील साहित्याबाबत पारदर्शकता ठेवण्यात आली असून त्यासाठी व्यायामपटूंची मदत घेतली जात आहे. राणेंच्या आजूबाजूला असलेल्या सत्ताधारी, लोकप्रतिनिधींप्रमाणे आधीच बिल देऊन मोकळे होणे ही प्रथा आता बंद झाली आहे असा टोला त्यांनी लगावला.

आमदार नाईक यांच्यावर अर्धवट माहिती घेत आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न राणेंनी केला आहे. आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून आलेल्या सर्व निधीच्या कामांची पूर्तता ही दर्जात्मक होण्यासाठी प्रशासन व शिवसेना पदाधिकारी कटिबद्ध आहेत. परंतु एखादी घोषणा लोकांसमोर करून त्यासाठी निधीच न आणणे आणि एखाद्या कामाचे उदघाटन करूनही त्या कामाचा पत्ताच नसेल तर संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू नये का? याचे उत्तर राणेंनी द्यावे. तळाशील, देवबाग बंधाऱ्याचे पुढे काय झाले याचे उत्तर राणेंनी द्यावे आणि या कामांची प्रथम काळजी करावी नंतरच आरोप करावेत अशी टीका केणींनी केली. आमदार नाईकांनी उपलब्ध करून दिलेल्या विकासनिधीमुळे आणि शहरातील विकासकामांमुळे हतबल झालेले भाजपचे पदाधिकारी व त्यांचे नेते हे केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रथम आपल्या खासदारांकडून किंवा सत्तेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी किती निधी आणला याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे असेही श्री. केणी यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!