पारंपरिक मच्छीमारांचे उपोषण स्थगित ; दत्ता सामंत यांची यशस्वी शिष्टाई !
मालवण (प्रतिनिधी) : ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन आदेशानुसार १ जानेवारी पासून ३१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करण्यास बंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकृत किंवा अनधिकृत पर्ससीन बोटींना ३ ऑगस्ट २०१७ च्या केंद्राच्या पत्रानुसार केंद्राच्या हद्दीत म्हणजे “ईईझेड” मध्ये मासेमारी करण्यास परवानगी आहे की नाही ? याबाबत स्पष्ट माहिती मिळण्याकरिता अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने स्वातंत्र्य दिनादिवशी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी भेट देऊन मच्छीमारांचे म्हणणे जाणून घेत आमदार नितेश राणे यांच्या मध्यस्थीने लवकरच मुंबईत मत्स्य आयुक्त यांची भेट घेऊन मच्छीमारांच्या प्रश्नाचे लेखी उत्तर मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांनी सायंकाळी हे उपोषण स्थगित केले.
भारतीय समुद्र किनारपट्टीमधील चिनी बोटींची घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने “ईईझेड” अर्थात भारतीय सागरी हद्दीत केवळ देशातील मासेमारी नौकांनाच मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र ३ ऑगस्ट २०१७ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन आदेशानुसार १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कायद्याचा आधार घेत महाराष्ट्रातही भारतीय मासेमारी हद्दीत देशातील लोकांना मासेमारी करण्यास परवानगी आहे का ? याचे लेखी उत्तर पारंपारिक मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडे मागितले होते. मात्र हे उत्तर देण्यास मत्स्यव्यवसाय खात्याकडून टाळाटाळ सुरू असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसांचे उपोषण छेडले. या उपोषणाला दुपारी भाजपा नेते दत्ता सामंत यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी केंद्राच्या पत्राच्या आधारे राज्यातील मासेमारी नौकाना १ जानेवारी ते ३० ऑगस्टपर्यंत मासेमारी करण्यास परवानगी आहे का ? याचे उत्तर राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर आमदार नितेश राणे यांचे या प्रश्नी लक्ष वेधून पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाची मुंबईत मत्स्यआयुक्तांसह भेट घडवून देत सदरील लेखी पत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही दत्ता सामंत यांनी दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, सदरील कालावधीत पत्र न मिळाल्यास २६ जानेवारीला बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही मच्छीमारांनी दिला आहे. यावेळी मंदार लुडबे, भाई मांजरेकर यांच्यासह मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे, सचिन तारी, संजय जामसंडेकर, चेतन तारी, प्रशांत तोडणकर, चेतन खडपकर, वसंत गावकर, तेजस्विनी कोळंबकर आदी मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते.