भाताच्या ‘बोनस’साठी महाविकास आघाडीच्या ‘बोगस’ आमदारांकडून “अशी ही बनवाबनवी”
भात खरेदी वरून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम वैभव नाईक यांनी थांबवावे
भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा टोला
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
भाताला बोनसची रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेच्या वैभव नाईक, राजन साळवी आणि अंबादास दानवे यांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याचा भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी समाचार घेतला आहे.
कुडाळ मालवणचे नौटंकी आमदार वैभव नाईक यांनी भात खरेदी मुद्द्यावरून शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा याकरिता विधानसभेत आंदोलनाचा स्टंट करून राज्यातील विशेषतः कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः ‘किमान आधारभूत किंमत खरेदी योजने’ अंतर्गत धान खरेदी ही केंद्र सरकारची योजना असून केंद्र सरकार मार्फत ‘शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये’ म्हणून ही योजना राबविण्यात येते. या अंतर्गत शेतकऱ्यांचे धान(भात) आणि भरडधान्ये खरेदी केली जातात. यामुळे राज्यातील आणि विशेषतः कोकणातील भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाताला विक्रमी भाव देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. केंद्र सरकारकडून होणाऱ्या खरेदीवर राज्यातील सरकार शेतकऱ्यांना ‘बोनस’ देते.
महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या ‘बोगस’ सरकारने गेल्या वर्षीच्या खरेदीच्या किमतीवर कोणत्याही प्रकारचा ‘बोनस’ जाहीर केला नाही. भात खरेदी पूर्ण होवून आता ६ महिने झाले. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही झोपला होता काय? आता शेतकऱ्यांची नवीन पिके तयार झाल्यानंतर आता विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांना शेतकऱ्यांच्या भात खरेदी वर ‘बोनस’ जाहीर व्हावा यासाठी स्टंटबाजी सुरू केली आहे. आताचे स्टंटबाजी करणारे आमदार सत्तेत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना भात खरेदीवर ‘बोनस’ का दिला नाही? त्यामुळे महाविकास आघाडीच्या ‘बोगस’ आमदारांनी ‘बोनस’ च्या नावाखाली बनवाबनवी करण्यापेक्षा त्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केले ते जाहीर करावे, असे दादा साईल यांनी म्हटले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या भाताला वाढीव दर मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून भाताला १९४० रुपयाचा दर मिळवून दिल्याचे प्रसार माध्यमातून म्हटले आहे. वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत कोणते प्रयत्न केलेत? याचे देखील पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेची माफी मागावी. देशभरातील सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कटिबद्ध असून केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान फसल बीमा योजना, आधारभूत किंमत धान खरेदी योजना आणि आता किसान रेल योजना सारख्या अनेक शेतकरी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.